मुक्तपीठ टीम
सध्याच्या काळात प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. बहुतेक सर्वच आप-आपल्यापरीने सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक वस्तूंचा वापर करत असतात. सुंदर दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री, मॉडेलच नाही तर राजकारणातील काही व्यक्ती कित्येक वेळा प्लास्टिक सर्जरी करत असतात. आपल्या शरीराच्या अवयवांना कृत्रिमरीत्या रेखीव आणि सुंदर बनवतात. मात्र ही शस्त्रक्रिया अपयशी झाली तर शरीरावर जीवघेणे घातक परिणाम होऊ शकतात. नुकताच एका अभिनेत्रीने अशा शस्त्रक्रियेदरम्यान जीव गमवला. त्यामुळेच प्लास्टिक सर्जरीमुळे कोणते धोके निर्माण होतात हे जाणून घेऊया…
सहा लोकप्रिय कॉस्मेटिक शस्त्रक्रिया
१. एब्डोमिनोप्लास्टी
ही शस्त्रक्रिया पोटाला योग्य आकारात आणण्यासाठी केली जाते. अतिरिक्त चरबी काढून आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. गर्भधारणेनंतर, महिला पोटाला योग्य आकारात आणण्यासाठी ही शस्त्रक्रिया करतात. ज्यांच्या पोटावर जास्त चरबी नाही, पण त्वचा लटकलेली आहे, अशा लोकांवर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दोन ते तीन आठवड्यांत सामान्य स्थितीत येतो.
धोका – औषधांच्या संसर्गाचा धोका असतो. तसेच काही वेळा पोटातही गुंतागुंतीच्या समस्या तयार होतात.
२. राइनोप्लास्टी
ही शस्त्रक्रिया नाकाच्या सौंदर्यासाठी केली जाते. जेव्हा नाक सपाट किंवा सामान्यपेक्षा मोठे असते तेव्हा लोक या शस्त्रक्रियेचा अवलंब करतात. महिला सुंदर दिसण्यासाठी नाक टोकदार करतात. ही शस्त्रक्रिया काही तासांत केली जाते आणि एक ते दोन दिवसांत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो.
धोका – यात जळजळ होण्याचा सर्वाधिक धोका असतो. याशिवाय इन्फेक्शनमुळे त्वचेचा रंगही बदलू शकतो. तसेच काहीवेळा नाकाचा आकार पुन्हा विचित्र होऊ शकतो.
३. लिपोसक्शन
याद्वारे पोट, मांडी, कंबर, हात, पाय यांवर शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये संबंधित भागाची चरबी काढून तिला योग्य आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे जळजळ.
धोका – शस्त्रक्रियेनंतर अनेक महिने सूज टिकून राहते आणि त्वचा लोंबते.
४. ब्रेस्ट ऑग्मेंटेशन
म्हणजेच स्तनाला आकार देणे. अलीकडच्या काळात ही शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. स्तनाच्या आकार वाढवणे, स्तनाचा आकार कमी करणे आणि स्तन लोंबत असतील तर ते उंचावणे या शस्त्रक्रिया केल्या जातात. या शस्त्रक्रियांनंतर एक किंवा दोन आठवड्यांत सर्व काही सामान्य होते, सांगण्यात येतं.
धोका – यात सर्वात मोठा धोका म्हणजे शस्त्रक्रियेनंतर स्तनामध्ये गाठ तयार होऊ शकते. काही वेळा त्यांच्यात सूज येते. त्यासाठी वापरलेले साहित्य हलक्या दर्जाचे असेल तर ते लिकही होते. त्यातून भीषण समस्या उद्भवू शकतात.
५. ब्लेफेरोप्लास्टी
ही शस्त्रक्रिया भुवयांवर केली जाते. स्त्रिया त्यांच्या झुकलेल्या भुवया आकारात आणण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. डोळ्याच्या जवळ असल्याने येथे धोका जास्त आहे. साधारणपणे १० ते १४ दिवसात सर्वकाही चांगले होते, असं सांगण्यात येतं.
धोका – शस्त्रक्रियेनंतर काही काळ सूर्यप्रकाश, धूळ आणि धूर टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण त्याचा संसर्ग झाला तर त्रास होतो. तसेच डोळ्यांना वारंवार चोळल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो.
६. रिटिडेक्टोमी
ही कॉस्मेटिक शस्त्रक्रिया वृद्धत्वाच्या सुरकुत्या काढून टाकण्यासाठी केली जाते. त्वचा घट्ट करून तरुण दिसण्याचा प्रयत्न केला जातो. कपाळ उंचावणे देखील कॉस्मेटिक सर्जरीचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कपाळावरील सुरकुत्या काढल्या जातात.
धोका – रुग्णाला सामान्य स्थितीत आणण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. त्वचेवर जळजळ आणि संसर्ग हा सर्वात मोठा धोका आहे. जो कायमच असतो.
कॉस्मेटिक सर्जरी
चे धोके
- कॉस्मेटिक सर्जरीमुळे तुम्ही सुंदर दिसाल, परंतु त्याचे धोकेही आहेत.अनेक वेळा अपेक्षित निकाल मिळत नाही.
- स्नायू खराब होतात. शस्त्रक्रियेचे डाग आयुष्यभर राहू शकतात. शस्त्रक्रियेनंतर स्तनामध्ये नेहमीच वेदना होण्याची शक्यता असते.
जर सर्जन अनुभवी नसतील तर अनेकदा शस्त्रक्रियेदरम्यान अतिरिक्त रक्तस्त्रावाची भीती असते. - सौंदर्य वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरीपैकी किमान एक टक्का प्रकरणांमध्ये एक मोठा धोका असतो. जिथं शस्त्रक्रिया केली जाते, शरीरावरील त्या ठिकाणी रक्तसंचय होऊन जणू काही रक्ताची पिशवीच तयार होते. या समस्येला हेमाटोमा म्हणतात.
- आणखी एक प्रकारचा धोका म्हणजे सीरोमा. सीरोमा स्थिती उद्भवते जेव्हा सीरम किंवा शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे द्रव त्वचेच्या पृष्ठभागाखाली येते. परिणामी, सूज आणि वेदना कायम राहतात. ही एक सामान्य गुंतागुंत आहे जी १५ ते ३० टक्के रुग्णांमध्ये दिसून येते.
- शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांना अनेकदा गुंगीसारखे वाटते. हे पेशींच्या नुकसानीमुळे होते. याशिवाय रक्त गोठणे (विशेषतः पायांमध्ये) ही देखील एक गुंतागुंत आहे. याला वैद्यकीय भाषेत डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतात.