मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील पाच नद्यांची प्रदूषणाच्या तावडीतून मुक्तता करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत (NRCP) प्रदूषण कमी करण्याच्या योजनांसाठी एकूण १ हजार १८२ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या पाच नद्यांच्या संवर्धनासाठी या निधीचा उपयोग करण्यात येईल. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि प्रकाश या शहरांमध्ये आतापर्यंत प्रतिदिन एकूण २६० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
एनआरसीपी अंतर्गत नद्यांमधील प्रदूषण कमी करण्याच्या कामांचे प्रस्ताव, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या अहवालांच्या प्राधान्यक्रमानुसार, एनआरसीपी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, स्वतंत्र विचारासाठी मूल्यांकन योजनेअंतर्गत निधीची उपलब्धता, इत्यादींच्या आधारे मंजूर केले जातात. याव्यतिरिक्त प्रदूषित नदीच्या पट्ट्यांतील सांडपाणी निर्मिती आणि प्रक्रिया यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एकूण १२७९.७० एमएलडी क्षमतेचे, ७६ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हाती घेतले आहेत.