मुक्तपीठ टीम
ओबीसी आरक्षणासंबंधित मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर ओबीसींचे राजकिय आरक्षण लागू होईपर्यंत मनपा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेचे अधिकार राज्य सरकार स्वत:कडे घेण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही मनपा निवडणुका घेण्याची जय्यत तयारी सुरु केली आहे.
मुंबई, ठाण्यासह सर्व मनपाच्या निवडणुकांची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली.
- प्रभाग रचनेचा मसुदा प्रसिद्ध झाला आहे.
- त्यावरील हरकती व सूचनांची सुनावणी झाली.
- या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने नेमलेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून आठ मनपाचे अभिप्राय निवडणूक आयोगाकडे आले.
- आता प्रभार रचनेचा आढावा, प्रभागांचे आरक्षण, मतदारयाद्यांची प्रसिद्धी आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर करणे ही प्रक्रिया शिल्लक असल्याचे निवडणूक आयोगातील उच्चपदस्थांनी सांगितले.
राज्य सरकारसाठी कसोटी
- निवडणूक प्रक्रियेचे अधिकार शासनाने स्वत:कडे घेण्यासाठी सोमवारी नगरविकास आणि ग्रामविकास कायद्यात बदल करणारी विधेयके मांडली जातील, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते.
- विधेयके एकमताने मंजूर झाली तरी त्याला राज्यपालांची संमती मिळेल का, असा प्रश्न आहे.
- कारण विधेयकाला संमती कधी आणि किती वेळेत द्यायची, याचे राज्यपालांवर बंधन नसते.
- तसेच हे अधिकार राज्य शासनाकडे स्वत:कडे घेण्याची कृती सर्वोच्च न्यायालयाच्या २००६मधील निकालाच्या विसंगत आहे.
- परिणामी, कायदेशीर लढाई अटळ आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेशात काय म्हटलं?
- सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालपत्रात मुदत संपलेल्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच महानगरपालिका, २०० नगरपालिका आणि ८०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घ्याव्यात, असा आदेश दिला आहे.
मध्यप्रदेशातील तरतूद कोणती?
- मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सांगितले.
- ७३व्या आणि ७४व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
- तत्पूर्वी महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये या निवडणुका राज्य सरकारमार्फत घेतल्या जात
होत्या. १९९४ मध्ये राज्य निवडणूक आयोग स्थापन झाला. - त्यावेळी निवडणुकांचे सारे अधिकार आयोगाकडे देण्यात आले.
- मध्यप्रदेश सरकारने मात्र प्रभाग रचना, प्रभागांमधील मतदारसंख्या, त्यांचे आरक्षण हे सारे अधिकार निवडणूक आयोगाकडे न देता स्वत:कडेच ठेवले होते.
- मध्यप्रदेश पंचायती कायद्यातील १०६ कलमानुसार हे सर्व अधिकार मध्यप्रदेश सरकारकडे आहेत.
- हेच अधिकार महाराष्ट्र सरकार १९९४ नंतर तीन दशकाने पुन्हा स्वत:कडे घेणार आहे.