मुक्तपीठ टीम
विम्याच्या रकमेचा परतावा देताना मूळ कागदपत्रे, सर्टिफिकेट कर्नाळा बँकेत जमा करून घेतली जात आहेत. त्याच्या अनुषंगाने एका कागदावर शिल्लक रक्कम लिहून दिली जात असल्याने ठेविदारांमध्ये भीतीचे आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त होताच पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी अवसायक बी. के. हांडे यांची भेट घेवून ठेविदारांना शिल्लक रक्कमेचे सर्टिफिकेट देण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार तातडीने सर्टिफिकेट देण्यास प्रारंभ केला आहे. दमडे यांना पहिले सर्टिफिकेट आज कडू यांच्या उपस्थितीत हांडे यांच्या हस्ते दिले गेले.
खारघर परिसरातील ठेविदारांनी कर्नाळा बँक लढ्यातील प्रमुख शिलेदार असलेले कांतीलाल कडू आणि सहकार्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार घडवून आणला होता. त्यावेळी झालेल्या संवादातून कर्नाळा बँकेत विम्याच्या पाच लाखापर्यंतच्या ठेवी परत करताना सर्व रक्कमेचे सर्टिफिकेट जमा करून घेतले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्याच्या बदल्यात शिल्लक रक्कमेची माहिती असल्याची संगणकीय प्रत दिली जात होती. त्यामुळे सर्व मूळ सर्टिफिकेट जमा केल्यानंतर पाच लाखापुढील रक्कम परत मिळवून घेताना आपल्याकडे तसा बँकेचा ठोस काहीच पुरावा राहत नसल्याने ठेविदार अस्वस्थ झाल्याचे समोर आले होते.
ठेविदारांच्या मनातील भीती, न्यूनगंड दूर करण्यासाठी कडू यांनी आपण बँकेचे अवसायक बी. के. हांडे यांच्याशी चर्चा करून यातून ठोस मार्ग काढू, असे आश्वासन खारघरच्या ठेविदारांना दिल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. त्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी आज हांडे यांची भेट घेवून तो प्रश्न मार्गी लावला आणि श्रीमती दमडे यांना शिल्लक रक्कमेचे सर्टिफिकेट तातडीने प्रदान केले. यावेळी हांडे, प्रविण म्हात्रे, राजाराम पाटील आणि कांतीलाल कडू उपस्थित होते.
महाडसाठी शनिवार!
महाड येथील ठेविदारांसाठी विशेष प्रयत्न करून कांतीलाल कडू यांनी तेथील शाखेत आठवड्यातील प्रत्येक शनिवारी सचिन मोरे आणि रवी राहूल उपस्थित राहतील आणि ठेविदारांचे अर्ज जमा करून घेतील, त्यानुसार त्यांच्या बँकेत पैसे जमा होतील. त्यासाठी त्यांना आता पनवेल येथील मुख्य शाखेत येण्याची गरज राहिली नाही. महाडचे ठेविदार मेहता यांनी कांतीलाल कडू यांच्याकडे गेल्या आठवड्यात मागणी केली होती, तीची पूर्तता करून महाडच्या ठेविदारांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे.
आता ४५० जणांशी संपर्क होणार
१७ फेबु्रवारीपासून विम्याचे पैसे वाटप करण्यास सुरूवात झाल्याने ठेविदारांचीही उत्सुकता वाढली आहे. बुडालेल्या बँकेतील मोठ्या रकमा परत मिळत असल्याने आता आपल्या खात्यात कधी प्रत्यक्षात जमा होतात, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यात आडनावाप्रमाणे पैसे वाटप होत असल्याने आपला नंबर येईपर्यंत पैसे शिल्लक राहतील का, अशा अनेक शंका-कुशंका मनात घर करून राहत असल्याने ठेविदारांनी कामाची गती वाढवावी, अशी विनंती कांतीलाल कडू यांना केली होती. त्यानुसार आज हांडे यांच्याकडे कैफियत मांडून दररोज ३५० जणांना फोन बँकेतून जात आहेत. त्यातून अवघे ३०० जण बँकेच्या संपर्कात येत असल्याने प्रत्यक्षात ३०० जणांनाच रक्कम मिळत आहे, असे समोर आले. त्यावर ४५० जणांना संपर्क साधल्यास सर्व ठेविदारांना लवकरात लवकर पैसे मिळतील असा दावा कडू यांनी केला. त्यानुसार हांडे यांनी आजपासून ४५० जणांना बोलावणार असल्याची स्पष्टोक्ती दिल्याने कामाची गती आपोआप वाढणार आहे.
४५ कोटीचे वाटप
विम्याचे ३७४ कोटी रूपये कर्नाळा बँकेत जमा झाल्यानंतर अवसायक हांडे, प्रवीण म्हात्रे, राजाराम पाटील आणि त्यांच्या ३० कर्मचार्यांनी अतिशय मेहनत घेवून ठेविदारांना परतावा मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे काल, बुधवारपर्यंत २०६८ ठेविदारांना ४५ कोटी रूपयांचे वाटप झाल्याचे हांडे यांनी कडू यांना सांगितले. येत्या दोन ते अडीच महिन्यात सर्व ठेविदारांना पैसे परत करण्याचा आराखडा तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
त्या ७ कोटींसाठी पुर्नप्रस्ताव!
विमा इन्शुरन्स कंपनीकडे बँकेने ३८१ कोटी रूपयांचा विमा प्रस्ताव पाठविला होता. काही तांत्रिक कारणामुळे ३७४ कोटी रूपयांचा प्रस्ताव विमा कंपनीने मंजूर केला. उर्वरित ७ कोटी रूपयांचा प्रस्ताव नाकारल्याने नेमकी कोणत्या ठेविदारांचा त्यात समावेश आहे, हे सुद्धा आता ठेविदारांसाठी कोडे आहे. त्यावर तातड़ीने विमा इन्शुरन्स कंपनीकडे पूर्नप्रस्ताव पाठविण्याची विनंती कडू यांनी आज केली. त्यानुसार येत्या आठवड्यात त्याची पूर्तता केली जाईल, असे हांडे यांनी सांगितले.
१७५ कोटी रूपये बाकी
विम्या व्यतिरिक्त पाच लाख रूपयांच्या पेक्षा जास्त ठेवी असलेल्या २४६८ ठेविदारांचे १७५ कोटी रूपये बाकी आहेत. त्याचा विम्याच्या रक्कमेशी अर्थाअर्थी काही संबंध नसून दोषी संचालक, दोषी कर्जदार यांच्यावरील फौजदारी कारवाईनंतर होणार्या मालमत्ता जप्तीच्या कार्यवाहीवर सारे काही अवलंबून असल्याने ते १७५ कोटी रूपये ठेविदारांना शानमध्ये परत मिळवून देण्यासाठी कांतीलाल कडू आणि सहकार्यांनी ठोस उपाययोजना आखली आहे.