मुक्तपीठ टीम
कर्नाटकमध्ये हिजाब वादावरून देशाचे वातावरण तापले आहे. कर्नाटकातील सरकारी महाविद्यालयात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना वर्गात बसण्यापासून रोखण्यात आलं. यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी सरकारचा निषेध केला. त्याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भगवे उपरणे घालत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. हा वाद सध्या कर्नाटक उच्च न्यायालयात सुरु आहे. मात्र या वादावरून एक व्हाईस मेसेज सध्या व्हायरल होतोय. “हिजाब आणि भगवा यावरून भांडू नका. जेव्हा आम्ही अशा गोष्टी पाहतो तेव्हा आम्हाला वाईट वाटते,” काश्मीर हिमस्खलनात शहीद झालेले हवालदार अल्ताफ अहमद यांचा हा अखेरचा मोलाचा संदेश आहे.
शहीद जवानाचा अखेरचा संदेश!
आपला जीव गमावण्यापूर्वी ३७ वर्षीय अल्ताफ यांच्या मोबाईलवरील हा शेवटचा व्हॉईस मेसेज त्यांच्या सहकारी सैनिकांनी शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केला. शेअर केलेल्या व्हॉईस मेसेजमध्ये अल्ताफ यांनी देशवासीयांना मतभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन केले आहे. अल्ताफ म्हणतात की, “चांगले रहा. धर्म आणि जातीच्या नावावर भांडू नका. आमचे सैनिक येथे (काश्मीर) सेवा करताना आपले प्राण पणाला लावतात, जेणेकरून तुम्ही स्वस्थ आणि सुरक्षित रहा. राष्ट्राचा विचार करा आणि तुमच्या मुलांनाही ते करायला शिकवा.”
अल्ताफ पुढे म्हणाले की, “हिजाब आणि भगव्यावरुन भांडू नका. अशा गोष्टी पाहिल्यावर आम्हाला वाईट वाटते. येथे आपले कर्तव्य बजावत असताना देशातील जनता चांगली आहे, असे मानतो. तसेच आपण सर्व भारतमातेची मुलं आहोत यावर विश्वास ठेवा. कृपया आमचे बलिदान वाया घालवू नका. जेव्हा आम्ही अशा गोष्टींबद्दल (हिजाब विवाद) ऐकतो तेव्हा आम्हाला वाईट वाटते, कारण सीमेवर आमच्या डोळ्यांसमोर अनेक लोक आपल्या प्राणांची आहुती देतात.”
अल्ताफ यांचा परिचय-
- आर्मी ऑर्डनन्स कोअरचा भाग असलेले कोडागुचे रहिवासी अल्ताफ काश्मीरमध्ये तैनात होते.
- त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
- अल्ताफ यांची पत्नी जुबेरी १० वर्षांपासून केरळमधील मत्तनूर जिल्ह्यात राहत आहे.
- ती मूळची विराजपेठेतील यडपाळ येथील आहे.
- मीनुपेटे येथे वाढलेल्या अल्ताफ यांनी विराजपेठेतील सेंट अॅन्स स्कूलमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केले.
- त्यानंतर विराजपेठ शासकीय कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले.
- त्यानंतर, आर्मी ऑर्डनन्स कोअरमध्ये रेजिमेंटमध्ये सामील झाले.
- त्यात ते १९ वर्षे काम करत होते.