प्रसाद नायगावकर/ यवतमाळ
सरकारी काम, अन् चार महिने थांब, हे तसं सामान्यांच्या चांगलंच अंगवळणी पडलेलं आहे. पण त्याच जनतेला त्यांनी केलेली मागणी वेळेपूर्वी पूर्ण झाली की कसा अत्यानंद होतो, याची प्रचिती नुकतीच आली. पुसद शहराजवळच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीत कचरा वाहून नेण्यास त्रास होत असल्याने कचरा गाडीची मागणी महिलांनी केली होती. ती त्यांच्या अपेक्षेपेक्षाही वेगानं लगेच पूर्ण झाली. अन् महिलांनी ‘गाडीवाला आया, घर से कचरा निकाल’, या गाण्यावर चक्क कचरा गाडीसमोरच ठेका धरला.
मुळातच स्वच्छतेची आवड असणाऱ्या गृहिणींना घर व परिसरातील कचरा आवडत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने घंटागाडी देताच श्रीरामपूरच्या बावने लेआउटमधील महिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील शहराला लागून असलेली श्रीरामपूर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. यात नोकरदार वर्गाचा मोठा भरणा आहे. या ग्रामपंचायतीमध्ये महिलांना घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीत नेऊन टाकायला फार त्रास सहन करावा लागत होता. कचरा वाहून नेण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी दीड महिन्यापूर्वी बावणे लेआऊटमधील महिलांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन कचरा गाडीची मागणी केली. या मागण्यांची त्वरित दखल सरपंच आशिष काळबांडे आणि सदस्य विजय राठोड, मधुकर कलींदर यांनी घेतली व दोन महिन्यांच्या आत घंटागाडीची व्यवस्था करण्याचे अभिवचन दिले. त्याची पूर्तता दीड महिन्यातच केल्याने महिला आनंदित झाल्या.
पाहा व्हिडीओ: