मुक्तपीठ टीम
अमेरिका आपल्या कंपन्यांच्या व्यावसायिक हिताचं रक्षण करण्यासाठी जगभरातील मुख्य बाजारांवर लक्ष ठेवत असते. त्यातून ज्या बाजारांमध्ये बनावट वस्तू विकल्या जातात, त्यांची यादी कुख्यात बाजार म्हणून प्रकाशित केली जाते.यावेळी भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट पाच बाजारांचा समावेश या यादीत आहे. त्यात मुंपईतीलही एका बाजाराचा समावेश आहे.
या यादीत मुंबईतील हिरापन्ना, इंडियामार्ट ऑनलाइन पोर्टल आणि नवी दिल्लीच्या प्रसिद्ध पालिका बाजारांचाही समावेश आहे. या पाच भारतीय बाजारांना अमेरिकेने कुख्यात असे म्हटले आहे. यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच यूएसटीआरने प्रसिद्ध केलेल्या जगातील कुख्यात बाजारांच्या ताज्या वार्षिक यादीमध्ये या बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. २०२१ वर्षासाठी जाहीर झालेल्या या यादीमध्ये जगभरातील ४२ ऑनलाइन आणि ३५ पारंपारिक बाजारपेठांचा समावेश आहे जे ट्रेडमार्क बनावट किंवा कॉपीराइट चोरीमध्ये गुंतलेले आहेत.
अमेरिकेने जाहीर केलेले भारतातील कुख्यात बाजार
- मुंबईतील हिरा पन्ना, कोलकातामधील किदारपूर आणि दिल्लीतील टँक रोड, दिल्लीतील पालिका बाजार, ऑनलाइन इंडिया मार्ट या यादीत समाविष्ट असलेल्या इतर तीन भारतीय बाजारपेठा आहेत.
- अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी कॅथरीन ताई म्हणाले की, “बनावट आणि पायरेटेड वस्तूंचा जागतिक व्यापार अमेरिकन नवकल्पनांना आणि रचनात्मकतेला कमकूवत करतो आणि अमेरिकन कामगारांना नुकसान पोहोचवतो.”
- ई-कॉमर्स वेबसाइट इंडियामार्टवर मोठ्या प्रमाणात बनावट फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांची विक्री करत असल्याचा आरोप आहे.
- मुंबईच्या हिरा पन्ना मार्केटमध्ये बनावट घड्याळे, शूज आणि सौंदर्यप्रसाधने मिळतात. तेथे विकले जाणारे बनावट सौंदर्य प्रसाधने त्वचेच्या गंभीर समस्या, जळजळ आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात.
- कोलकात्याच्या किदारपूरमध्येही अशीच परिस्थिती आहे, जिथे मोठ्या ब्रँडच्या नावाखाली बनावट कपडे आणि सौंदर्यप्रसाधने विकली जातात.
- दिल्लीचा पालिका बाजारही कुख्यात बाजारपेठांच्या यादीत आहे. राष्ट्रीय राजधानीतील हे भूमिगत बाजार बनावट मोबाइल अॅक्सेसरीज, सौंदर्यप्रसाधने, घड्याळे आणि आयवेअरच्या कथित विक्रीसाठी ओळखले जाते.
- येथे मोठ्या प्रमाणात खरेदीदार विद्यार्थी आणि तरुण आहेत ज्यांना परवडणाऱ्या किंमतीत आधुनिक उत्पादने हवी आहेत.
- दिल्लीचे टँक रोड मार्केटही बनावट उत्पादनांसाठीही ओळखले जाते.
कुख्यात बाजारपेठांची यादी २०११ पासून होत आहे जाहीर
- यूएसटीआरने २००६ मध्ये प्रथम अशा कुख्यात बाजारांची ओळख पटवली.
- फेब्रुवारी २०११ पासून, सार्वजनिक जागरूकता वाढवण्यासाठी ते कुख्यात बाजारांची यादी वार्षिक आधारावर जाहीर करत आहे.
अलीबाबा आणि टेनेसेंटद्वारे चालवल्या जाणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सचा कुख्यात बाजारपेठांमध्ये समावेश
- अमेरिकेने चिनी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज अलीबाबा आणि टेनेसेंटद्वारे चालवल्या जाणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटचाही कुख्यात बाजारांच्या यादीत समावेश केला आहे.
- यामध्ये अलीएक्सप्रेस आणि वीचॅट यांचाही समावेश आहे.
- अलीएक्सप्रेस ही अलीबाबाच्या मालकीची आहे, तर टेनसेंट ही वीचॅटची मूळ कंपनी आहे.
बनावट वस्तूंमुळे दरवर्षी एक लाख कोटींचे नुकसान
सर्टिफिकेशन इंडस्ट्री असोसिएशन (एएसपीए) नुसार, बनावट उत्पादनांमुळे देशाला दरवर्षी एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान होत आहे. जागरूकता आणि देखरेखीचा वापर करून अशा उत्पादनांवर ५० टक्के बंदी घातली तर भारताची वार्षिक ५० हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा संघटनेचा विश्वास आहे. बहुतांश बनावट औषधे भारतात बनतात. गेल्या काही वर्षांत जगातील व्यापारातील बनावट वस्तूंचा वाटा ३.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.