मुक्तपीठ टीम
सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग यांनी त्यांच्या संसदेतील भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची प्रशंसा केली. त्याचवेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य वाद माजवणारे ठरले. ते म्हणाले, “भारतीय लोकसभेच्या जवळपास अर्ध्या भारतीय खासदारांवर गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत.” त्यांच्या या वक्तव्यला भारताने तीव्र आक्षेप घेतला. सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वांग यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आले की ही टिप्पणी अनावश्यक आहे.
पंडित नेहरूंची केली प्रशंसा
- सिंगापूरच्या पंतप्रधानांनी संसदेतील ४० मिनिटांच्या भाषणात लोकशाही व्यवस्थेला प्रामाणिक संसदपटूंची कशी गरज असते याविषयी सांगितले.
- भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, लोकशाहीने देशात कसे कार्य केले पाहिजे.
- स्वातंत्र्य लढा लढलेले आणि जिंकलेले नेते हे सहसा खूप धाडसी आणि असाधारण असतात.
- जवाहरलाल नेहरू यांनी संघर्षांवर मात केली.
- ते लोक आणि राष्ट्रांचे नेते म्हणून उदयास आले.
- अशा नेत्यांमध्ये डेव्हिड बेन-गुरियन्स आणि जवाहरलाल नेहरू यांचा समावेश आहे आणि आमचेही नेते यात आहेत.
“प्रामाणिक संसदपटूंची देशाला गरज” यावर बोलताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खासदारांचा उल्लेख…
ली सीन लूंग म्हणाले की, “आज अनेक राजकीय व्यवस्था त्यांच्या संस्थापक नेत्यांबद्दल उदासीन आहेत. बेन-गुरियनचा इस्रायल हा दोन वर्षांत चार सार्वत्रिक निवडणुकांनंतर जेमतेम सरकार स्थापन करू शकणारा देश बनला आहे. दरम्यान, इस्रायलमधील अनेक ज्येष्ठ राजकारणी आणि अधिकारी गुन्हेगारी आरोपांना सामोरे जात आहेत आणि काही तुरुंगात आहेत. तर नेहरूंचा भारत असा झाला आहे की, मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकसभेच्या जवळपास निम्म्या सदस्यांवर फौजदारी खटले प्रलंबित आहेत. यामध्ये बलात्कार आणि खुनाच्या आरोपांचा समावेश आहे. यातील अनेक आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही बोलले जाते.”
सिंगापूरची अधोगती टाळण्यासाठी काय?
“सिंगापूरला त्याच मार्गावर जाण्यापासून रोखण्यासाठी काय केले गेले पाहिजे? असा प्रश्न ली सिएन लूंग यांनी उपस्थित केला आणि म्हणाले, काहीही नाही. आम्ही इतर देशांपेक्षा आंतरिकदृष्ट्या हुशार किंवा अधिक सद्गुणी नाही. आधुनिक सिंगापूर अयशस्वी-सुरक्षित यंत्रणेसह जन्माला आलेला नाही.