मुक्तपीठ टीम
“समाजातील गरीब, गरजू घटकांतील हजारो विद्यार्थ्यांचा आधारवड असलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या स्थापनेत डॉ. अच्युतराव आपटे यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी समितीच्या रूपात लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. युवा परिवर्तनाचे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरक आहे,’’ असे प्रतिपादन संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
डॉ. अच्युतराव आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त फर्ग्युसन रस्त्यावरील समितीच्या आपटे वसतिगृहात आयोजित ‘अच्युतराव आठवताना’ या विशेष कार्यक्रमात डॉ. शिकारपूर बोलत होते. प्रसंगी माजी विद्यार्थी सुभाषचंद्र भोसले व सुधाकर न्हाळदे यांनी अच्युतराव यांच्या आठवणींना उजाळा दिला. समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त सुप्रियाताई केळवकर, खजिनदार संजय अमृते, विश्वस्त रत्नाकर मते, तुषार रंजनकर, कार्यकर्ते मनोज गायकवाड, गणेश कळसकर, स्नेहा फडके आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष आपटे यांच्या देणगीतून गुणवंत विद्यार्थी सोनु राठोड, अस्मिता शिंदे, निशान रॉय, नंदकिशोर घुगे, सोहम दरेकर यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
डॉ. दीपक शिकारपुर म्हणाले, ‘‘डॉ. अच्युतराव आपटे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे ध्येय ठेवून सुरू केलेला हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांनी जपलेले सामाजिक भान आणि जोडलेली असंख्य माणसे ही त्यांनी लावलेल्या रोपट्यापासून वटवृक्षापर्यंत रूपांतर होणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार आहेत. फळाची अपेक्षा न धरता त्यांनी आपले आयुष्य समाजाला अर्पण केले. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण समाजामध्ये प्रगती करणे गरजेचे आहे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता आणि महत्वाकांक्षा आपल्याकडे असेल, तर यशाचे क्षितीज आपण गाठू शकतो. नियमित शिक्षणासह परदेशी भाषा शिकण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.”
सुभाषचंद्र भोसले म्हणाले, “अच्युतराव आपटे हे माझ्या आयुष्याचे खरे शिल्पकार आहेत. पुस्तके आणि माणसांचे चेहरे वाचायला आपटे सरांनी कायमच शिकवले.
स्वावलंबन, प्रमाणिकता ही त्यांची शिकवण होती. आयुष्य जगताना त्यांचे विचार प्रत्येक टप्प्यावर महत्वपूर्ण ठरत आहेत.”
सुधाकर न्हाळदे म्हणाले, “अच्युतराव आपटे यांच्या विचारांच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी घडले आहेत. त्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले. धर्मनिरपेक्षता हा अच्युतराव आपटे यांचा स्थायीभाव होता. धार्मिक पूजाअर्चा करण्यापेक्षा सामाजिक कार्य करण्यावर त्यांचा अधिक भर असे.” सुप्रिया केळवकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.