मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला तर शेवटच्या टप्प्याचे मतदान ७ मार्चला होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सपाच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. राज्यात भाजपचे सरकार जाणार असून सपाचे सरकार येणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवांपासून सर्व सपा नेते करतात. त्यातील एका नेत्याने तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निकालाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीचे ११ मार्चचे गोरखपूरला जाणारे फ्लाइट तिकिटही बुक करून ठेवले आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि माजी मंत्री आयपी सिंह यांनी लखनऊहून गोरखपूर या योगी आदित्यनाथांच्या मतदारसंघात जाण्याचे तिकिट बुक केले आहे. हे तिकिट त्यांनी योगी आदित्यनाथांच्या नावावरच बुक केले आहे. आयपी सिंग अनेकदा आपल्या ट्वीटद्वारे भाजप सरकारवर हल्लाबोल करतात. यावेळी ते मुख्यमंत्री योगींच्या फ्लाइट बुकिंगच्या फोटोसह केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आहेत.
ट्विटरद्वारे भाजपावर केलेला हल्लाबोल
- सपाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी ट्विट करून सांगितले की, १० मार्च हा दिवस जनतेचा दिवस असेल.
- १० मार्च रोजी राज्यात सत्याचा सूर्य उगवेल आणि सपा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल.
- यामुळेच मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ११ मार्च रोजी लखनौ ते गोरखपूरचे परतीचे तिकीट बुक केले आहे. असे आयपी सिंह म्हणाले.
- ते पुढे म्हणाले, हे तिकीट सांभाळा, कारण पराभवानंतर भाजपही तुम्हाला विचारणार नाही.
ट्विटरवर आयपी सिंहांवर हल्लाबोल
- तुम्ही स्वत:चे लखनऊचे तिकिट बुक करा. तुम्हाला स्टेजवर जागा मिळणार नाही, पण शपथ पाहायला आणि ऐकायला मिळेल.
- बसने पाठवण्याच्या लायकीचे ही नाही. तुम्ही उगाच खर्च केलात.
- माझ्यासाठीही तिकीट बुक करा, अखिलेशजी हरल्यानंतर त्यांना भेटायला जावे लागेल.
- तिकीट बुक केल्याबद्दल धन्यवाद! योगीजी त्याच दिवशी त्याच तिकिटावर गोरखपूरच्या मंदिरात जाऊन पाया पडतील आणि आशीर्वाद घेतील.