मुक्पीठ टीम
आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांनी प्रेरित पुण्यातील शास्त्रज्ञांच्या गटाने आक्रमक प्रोस्टेट कर्करोगासाठी संभाव्य थेरपी शोधली आहे. ही थेरपी प्रभावी ठरल्याचे संशोधनातून समोर आले आहे. रसायनी बायोलॉजिक्स प्रा. लिमिटेडच्या (आरबीपीएल) रिसर्च लॅबमध्ये झालेल्या या संशोधनाचा प्रबंध ‘द युरोपियन मल्टीडिसिप्लिनरी युरोलॉजिकल कॉग्रेस (ईएमयूसी) २०२१’ या नामांकित आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादरीकरणासाठी स्वीकारण्यात आला आहे, अशी माहिती रसायु कॅन्सर क्लिनिक व संशोधन गटाचे प्रमुख डॉ. योगेश बेंडाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘आरबीपीएल’च्या संशोधनानुसार, आयुर्वेदामध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याची मोठी क्षमता आहे. परंतु ते जनसामान्यांसाठी अधिक उपयुक्त बनवण्यासाठी आणि त्याचवेळी जागतिक स्तरावर स्वीकार्य होण्यासाठी वैज्ञानिक संशोधन अभ्यास करणे आणि अशा उपचारांसाठी उच्च पातळीचे पुरावे स्थापित करणे खूप महत्वाचे आहे. या उद्देशाने ही अत्याधुनिक संशोधन सुविधा विकसित केली आहे. ‘आरबीपीएल’ला भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाने मान्यता दिली आहे. वैज्ञानिक संशोधन अभ्यास करणे आणि पुराव्यावर आधारित सुरक्षित, प्रभावी आणि सहज प्रशासित उपाय उपलब्ध करून देणे हे दीर्घकालीन आणि गंभीर आजारांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट आहे. संशोधन आणि आयुर्वेदाचे पारंपारिक ज्ञान यांचे संयोजन कर्करोगाच्या रूग्णांचे जीवन सुधारण्यासाठी सर्वोत्तम उपचारात्मक परिणामांचे रुपांतर करते. आरबीपीएल नेहमीच आयुर्वेदाने साध्य केलेले हे मूर्त परिणाम दाखविण्यासाठी, जागतिक वैज्ञानिक संस्थेला सर्वात विश्वासार्ह आणि समकालीन वैज्ञानिक भाषेत सादर करण्याचे उद्दिष्ट ठेवते, असे डॉ. बेंडाळे म्हणाले.
डॉ. योगेश बेंडाळे म्हणाले, “प्रोस्टेट कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि पुरुषांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. प्रोस्टेट कर्करोगाचा उपचार हा अनेक आव्हाने आणि वादांशी संबंधित आहे. आजाराचा नेमका टप्पा ओळखून उपचार देणे आवश्यक आहे. कॅस्ट्रेशन रेझिस्टंट प्रोस्टेट कॅन्सर (CRPC) हे इतर प्रोस्टेट कॅन्सरच्या तुलनेत वाईट रोगनिदान, बिघडलेली जीवन गुणवत्ता आणि कमी कमी जीवित्व आहे. या कंपाऊंडची आधीच कॅन्सरच्या रूग्णांवर पद्धतशीर क्लिनिकल चाचण्यांमध्ये चाचणी केली गेली आहे. क्लिनिकल चाचणीने हे औषध चांगले सहन करण्याजोगे आणि सुरक्षित असल्याचे दर्शविले आहे.”
“पारंपारिक केमोथेरपीवरील या रूग्णांवर विषारी दुष्परिणामांसाठी निरीक्षण करणे आवश्यक आहे. हे सर्व घटक अप्रत्यक्ष उपचार खर्च वाढतात. तोंडावाटे देण्यायोग्य थेरपीचे हे अप्रत्यक्ष खर्च कमी करत असल्याने थेरपी खूप परवडणारी होईल. दुर्गम भागात विशेष आरोग्यसेवा उपलब्ध नसलेल्या विकसनशील राष्ट्रे आणि तिसऱ्या जगातील देशांतील रुग्णांना याची मोठी मदत होऊ शकते. हा नवीन औषध विकास कार्यक्रम आयुर्वेदाच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. ‘आरबीपीएल’ आयुर्वेदासाठी वैज्ञानिक पुरावे निर्माण करण्यासाठी समर्पित काम करत आहे. अधिकाधिक वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत औषधे निर्मिली जातील. भारतातील कर्करोगाची परिस्थिती, भारतीय कर्करोगाच्या रुग्णांच्या गरजा त्यांच्या पाश्चात्य समकक्षांपेक्षा भिन्न आहेत. भारतीय शास्त्रज्ञांनी नवीन औषध विकासासाठी काम केले पाहिजे जे आमच्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करेल,” असेही त्यांनी नमूद केले.
अशी आहे संशोधकांची टीम
डॉ. उल्हास वाघ, डॉ. पद्मा शास्त्री आणि डॉ. कल्पना जोशी (मुंबई) औषध विकासातील वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनात डॉ. योगेश बेंडाळे नेतृत्वात हे संशोधन झाले. डॉ. राधा पुजारी, नंदिनी खोत, सुरेन नागरे आणि डॉ. अविनाश कदम यांचा समावेश होता. ‘आरबीपीएल’ ही आयुर्वेद ऑन्कोलॉजीमध्ये वैज्ञानिक संशोधन करणारी आणि परंपरागत ऑन्कोलॉजीच्या नामांकित आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक व्यासपीठांवर त्याचे निष्कर्ष सादर करणारी अग्रणी संशोधन संस्था आहे.
संशोधनाचे निष्कर्ष
- कंपाऊंड प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींचा पारंपारिक केमोथेरप्यूटिक एजंटच्या समान मर्यादेपर्यंत प्रतिबंधित करते
- प्रोस्टेट कर्करोगास कॅस्ट्रेशन (शस्त्रक्रिया) प्रतिरोधक दर्शवितो
- प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांमध्ये परिणाम सुधारण्याची मोठी क्षमता
- कर्करोगाच्या पेशींसाठी निवडकपणे विषारी असल्याचे आढळले
- उपलब्ध केमोथेरपीच्या औषधापेक्षा, परिणामकारक व अधिक सुरक्षित
- औषध चांगले सहन करण्याजोगे आणि सुरक्षित
- औषध तोंडावाटे दिले जाऊ शकते, परिणामी दुर्गम भागातही रुग्णांसाठी ते सहज उपलब्ध
- कमी खर्चिक, रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही
“प्रोस्टेट कर्करोगावरील या थेरपीचा प्रभाव जाणण्यासाठी पीसी ३ सेल लाइन्सवरील अभ्यासाचे निष्कर्ष उत्साहवर्धक आले आहेत. हे औषध तोंडावाटे दिले जाऊ शकते. त्यामुळे विशेष कॅन्सर रुग्णालये नसलेल्या दूरच्या भागातही रुग्णांसाठी ते सहज उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचीही आवश्यकता भासणार नाही.”
– डॉ. योगेश बेंडाळे, रसायु कॅन्सर क्लिनिक