मुक्तपीठ टीम
मिटिंगमध्ये मिटिंग नको, असे आपण अनेकदा ऐकत असतो. एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना एकमेकांशी कुणी बोलत असले तर त्यांना तसे झापले जाते. आता तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंत्र्यांना दटावले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना “सभागृहात बसून कार्यालयीन कामकाज करू नका” असा सल्ला दिला. प्रश्नोत्तराच्या तासानंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह एका खासदाराशी बोलताना दिसले. त्यामुळे संतापलेले ओम बिर्ला म्हणाले, ‘माननीय खासदार, मंत्र्यांनी इथून कार्यालये चालवू नयेत. मंत्र्यांनी खासदारांना कार्यालयात भेटण्यास सांगावे, सभागृहाचा सन्मान राखावा, असे त्यांनी बजावले.
सभागृहाच्या कामकाजादरम्यान विविध पक्षांचे सदस्य मंत्र्यांच्या आसनावर जाऊन मंत्रालयाशी संबंधित काही मुद्दे मांडतात, मंत्रीही बोलू लागतात. प्रश्नोत्तराचा तास संपल्याची घोषणा झाल्यानंतरही एका प्रश्नाचे उत्तर देण्यास बिर्ला यांनी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांना रोखले आणि म्हणाले, ‘मंत्री महोदय, बसा… मी म्हणालो की प्रश्नोत्तराचा तास संपला आहे तरीही तुम्ही बोलत आहात.’
आणखी काय घडलं लोकसभेत?
- लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ओमायक्रॉनच्या धोक्याला तोंड देण्याच्या तयारीवर केंद्र सरकारकडून माहिती मागितली.
- कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घेतला आहे त्यांची सरकार युनिक आयडेंटिफिकेशन (आयडी) बनवत आहे.
- काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मांडला.
- गेल्या सात वर्षांत आठ लाख ८१ हजार २५४ लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे.
- मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या की, देशात एअर गनने पक्ष्यांवर गोळ्या झाडल्या जात आहेत. यावर पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी या प्रश्नाची जाणीव असल्याचे सांगितले. ते म्हणाले की अशा प्रकरणांमध्ये राज्यांकडून योग्य ती कारवाई केली जाते.
केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, सुरक्षा संबंधित खर्च योजनेंतर्गत, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी प्रभावित जिल्ह्यांची संख्या १२६ वरून ७० वर आली आहे. हे आकडे जुलै २०२१चे आहेत.