मुक्तपीठ टीम
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत त्यांच्या पत्नी आणि इतर ११ लष्करी अधिकाऱ्यांचं बुधवारी निधन झालं. शुक्रवारी दिल्लीत जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांना व त्यांची पत्नी मधुलिका रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला.
रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव एक फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. लोक हातात तिरंगा घेऊन ट्रकच्या मागे पळताना दिसत होते. यावेळी अमर रहे, अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे मंत्रोच्चारात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना १७ तोफांची सलामी देण्यात आली. त्यांची मुलगी कृतिका हिने आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला.
अनेक बडे नेते आणि अधिकारी अंत्ययात्रेत सामिल
- सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते.
- दिल्ली आणि आजपासच्या राज्यातूनही लोक आले होते.
- तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते.
- स्वत: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रावत यांच्या अंत्ययात्रेत सामिल झाले होते.