मुक्तपीठ टीम
अॅडमिरल आर हरी कुमार यांनी मंगळवारी भारतीय नौदलाचे २५ वे प्रमुख म्हणून राजधानी दिल्लीत पदभार स्वीकारला. त्यावेळी घडलेली एक ह्दयस्पर्शी घटना सर्वांच्या मनाला भावली. अॅडमिरल आर हरी कुमार यांनी पदभार स्वीकारला, त्यावेळी त्यांच्या ८० वर्षीय मातोश्री विजयालक्ष्मी तेथे होत्या. आई समोर येताच त्यांच्यातील कडक गणवेशधारी आणि मानाची तलवार हाती असलेल्या सर्वोच्च अधिकाऱ्याची जागा , पुत्राने घेतली. तिच्याविषयी त्यांच्या असलेल्या भावना आईच्या चरणी झुकल्या. आईनेही आनंदाच्या आवेगाने, आपल्या चिरंजिवाला परमोच्च आनंदाने कवटाळले…पुत्राच्या युनिफॉर्मवर ल्यायलेल्या मानाच्या पदकांना डोळे भरून पाहात, त्यांचाही मुका घेऊन आपलेही ‘नि:शब्द पदक’ लावले.
- अॅडमिरल आर हरी कुमार नौदल प्रमुखाचे सर्वोच्च पद स्विकारण्यापूर्वी ते मुंबई येथील पश्चिम नौदल मुख्यालयाचे ध्वजाधिकारी (फ्लॅग आॅफिसर) कमांडिंग-इन-चीफ होते. अलिकडेच भारतीय नौैदलातून निवृत्त झालेली विमानवाहू युद्धनौका ‘विराट’च्या प्रमुखाची (कमांड) धुरा यशस्वीपणे सांभाळली होती.
- मावळते अॅडमिरल करमबीर सिंग यांचे ते उत्तराधिकारी आहेत. सिंग यांची तब्बल ४१ वर्षे नौदलात उत्कृष्ट कारकीर्द आहे. त्यानंतर ते निवृत्त झाले.
- दिल्लीत नौदल मुख्यालयात चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि डिपार्टमेंट आॅफ मिलिटरी अफेअर्स (डीएमए) या अत्यंत महत्वाच्या संस्थेच्या निर्मिती होत होती. त्या प्रक्रियेत त्यांनी ‘चेअरमन , चिफ्स आॅफ स्टाफ कमिटी (सीआयएससी) चे ‘चीफ आॅफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ ’ हे मोठ्या जबाबदारीचे भूषणावह पद त्यांनी कुशलरित्या सांभाळले होते.
अॅडमिरल आर हरी कुमारांचा लखलखता प्रवास
- अॅडमिरल आर हरी कुमार हे खडकवासला येथील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत.
- १ जानेवारी १९८३ रोजी त्यांची नौदलात नियुक्त झाली.
- त्यांच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय तटरक्षक दलातील सी ०१ नौका आणि भारतीय नौदलाच्या ताफ्यातील निशंक, कोरा, रणवीर या युद्धनौकांचे नेतृत्व केले आहे.
- ‘तोफखाना तज्ज्ञ’ असलेले कुमार यांनी पश्चिम ताफ्याचे ‘फ्लीट आॅपरेशन्स आॅफिसर’ आणि फ्लीट तोफखाना अधिकारी, ‘विपुल’ नौकेचे कार्यकारी अधिकारी (एक्सो), ‘रणजीत’चे तोफखाना अधिकारी होते.
- रणवीर नौका समारंभपूर्वक नौैदलात दाखल होताना अत्यंत निवडक अधिकारी आणि नौसैनिक यांचा समावेश असलेल्या कमिशनिंग क्रूमध्ये आणि ‘कुठार’नौकेच्या कमिशनिंग समारंभातही त्यांचा कमांड तोफखाना अधिकारी होण्याचा सन्मान लाभला होता.
- नौदलाच्या मुंबईतील पश्चिम मुख्यालयातही ‘कमांड गनरी आॅफिसर’ या अत्यंत महत्वाच्या पदाची धुरा होती.
- त्यांना सुपूर्द केलेल्या नियुक्त्यांमध्ये सेशेल्स सरकारचे नौदल सल्लागार, सोमालियात युएन मिशन असताना त्यांची मोगादिशू येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- आयएनएस द्रोणाचार्य येथे ते ट्रेनिंग कमांडर होते.
ध्वज अधिकारी म्हणून त्यांनी गोवा येथील नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट, (एफओएसटी), पश्चिम ताफ्याचे ध्वजाधिकारी (फ्लॅग आॅफिसर), मुंबईतील पश्चिम विभागाचे चीफ आॅफ स्टाफ, नौदल मुख्यालयात कंट्रोलर पसोर्नेल सर्व्हिसेस आणि चीफ आॅफ पर्सनल ही महत्वपूर्ण पदे भुषविली आहेत.
आई आणि पुत्राचे अलिंगन…तो क्षण अत्यंत ह्रदयस्पर्शी होता!
अॅडमिरल आर हरी कुमार यांनी पदभार स्वीकारला, त्यावेळी त्रिवेंद्रम येथे राहणा-या त्यांच्या ८० वर्षीय मातोश्री विजयालक्ष्मी आणि अन्य कुटुंबिय उपस्थित होते. नौदल प्रमुखाचे पद स्वीकारले असले तरी, आईविषयी त्यांच्या मनात असलेले ममत्व, कुटुंब-नातेवाईंकांबद्दल असलेला स्नेह, जिव्हाळा, आस्था आणि प्रेम उचंबळून आले. त्यांच्या मातोश्रींसह अन्य नातेवाईंकांचे उर भरून आले. आई समोर येताच त्यांच्यातील कडक गणवेशधारी आणि मानाची तलवार हाती असलेल्या सर्वोच्च अधिका-याची जागा , पुत्राने घेतली आणि तिच्याविषयी असलेल्या भावना आईच्या चरणी झुकल्या. आईनेही आनंदाच्या आवेगाने, आपल्या चिरंजिवाला परमोच्च आनंदाने कवटाळले…पुत्राच्या युनिफॉर्मवर ल्यायलेल्या मानाच्या पदकांना डोळे भरून पाहात, त्यांचाही मुका घेऊन आपलेही ‘नि:शब्द पदक’ लावले. तो क्षण अत्यंत ह्रदयस्पर्शी होता. तो पाहून उपस्थित असलेले सर्वजण भारावले गेले.