शुध्दोधन कांबळे
एखादा वास्तविक व ऐतिहासिक चित्रपट खूप यशस्वी होतो तेंव्हा त्यावर वाद होणे हे आपल्याकडे नित्याचे झाले आहे. जय भीम या चित्रपटाबद्दल पण हे घडत आहे, एक वर्ग या चित्रपटाची तोंडभरून स्तुती करत आहे तर दुसरा वर्ग चित्रपटात पोलिसांच्या चित्रणावर आक्षेप नोंदवित आहे. कोर्ट रुम ड्रामा असलेल्या हा चित्रपट कोठडीत मृत्यू झालेल्या राजकन्नु या ईरुला जमातीतील व्यक्तीवरील हेबिअस काॕर्पसच्या केसवर आधारित आहे. हि घटना १९९३ मध्ये तामिळनाडू मध्ये प्रत्यक्षात घडली होती. चंद्रु या वकीलाने ही केस यशस्वीपणे हाताळून पीडीत कुटूंबाला न्याय मिळवून दिला होता. हा वास्तविक चित्रपट दिग्दर्शक टी. ग्यानवेल व अभिनेता सुर्या यांच्या मेहनतीने उत्कृष्ट बनला आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतूक होत असताना काही बाबींवर आक्षेप नोंदविण्यात येत आहे.
समाजातील एक वर्ग असा आहे ज्यांना दलित, अदिवासी सारख्या पीडित समुदायांवरील अत्याचाराची क्रूरता किती तीव्र आहे हे माहिती नसते. जेंव्हा दलित साहित्यात अन्याय व अत्याचार वाचायला मिळू लागला त्यावर देखील दुःखाचे बाजारीकरण करण्यात येत असल्याचे आरोप झाला होता. या साहित्यातील जीवन हे वास्तविक आहे याचा स्वीकार व्हायला बराच वेळ लागला होता. पोलिस कायद्याचे रक्षक आहेत, या सर्वसाधारण धारणेला छेद देणारा हा चित्रपट आहे. कोठडीत दरवर्षी शंभर लोक मरतात, त्यापैकी पोलिस अत्याचारात मरणाऱ्यांची टक्केवारी दहा टक्यावरुन एक टक्यावर घसरली आहे. या आकडेवारीवर आपण विश्वास ठेवायचा का? हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. काही जाती व जमातीवर सतत अत्याचार का होतो? खैरलांजीसारख्या घटना घडणाऱ्या गावाला आदर्श गाव पुरस्कार कसा मिळतो? अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास तटस्थपणे केला तर आपल्याला वास्तविकता लक्षात येईल. बाॕलीवुडमध्ये पोलिसांचे होणारे उदातीकरण आणि हैद्राबाद रेप केसमध्ये घडणाऱ्या फील्मी घटना, यातून जय भीम चित्रपटातील पोलिसांच्या भुमिकेवर विश्वास करणे कठीण वाटते. परंतु हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे व सर्व घटनाक्रम कुठल्याही ‘तारीख पे तारीख ‘ सारख्या फिल्मी संवादाविना दाखविल्यामुळे हा चित्रपट परिणामकारक ठरला आहे.
एखाद्या समुहातील काही लोक गुन्हेगार असल्यामुळे सर्व समुदाय गुन्हेगारीच्या चष्म्यातून पाहणे हे जसे चुकीचे तशाच प्रकारे काही पोलिसांच्या चुकीच्या वर्तनामुळे सर्व पोलिस खाते चुकीचे समजणे चुकीचे आहे. या उलट हा चित्रपट पोलिस व कायदा यावरचा उडत चालेला विश्वास दृढ करणारा आहे. न्याय व्यवस्था सुरळीत चालविण्यासाठी वकील व न्यायाधीश यांची जशी जबाबदारी आहे तशीच ती न्याय मागणा-या व्यक्तीच्या ठाम भुमिकेवर देखिल आवलंबून आहे. या चित्रपटाची नायिका संगेनी कुठलाही प्रलोभन व दबावाला बळी न पडता आपल्या भुमिकेवर ठाम राहते. दलित व अदिवासी स्त्री ही दुहेरी पीडीता असते, पुरूष प्रधान पध्दतीचे व जातीयतेचे चटके तिला एकाच वेळेला सहन करावे लागतात. अशा परिस्थितीही अढळ राहणारी संगेनी मला युध्दात लढणा-या सैनिका सारखी बलशाली वाटते. संगेनी हे पात्र सर्व बाजूंनी संकटे असतांना परिस्थितीशी मुकाबला करण्याचे बळ देते. अशा संकाटाचा सामना करणारी स्त्री पण खरच होती का? असा प्रश्न देखील अनेक स्त्रीयांना पडू शकतो.
हा चित्रपट आंबेडकरवादी की मार्क्सवादी यावर चर्चा न करता ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष’ हा डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलमंत्र सांगतो हे विशेष. न्या. चंद्रु यांना बाबासाहेबांपासून प्रेरणा मिळाली, ते सुरवातीला मार्कसवादी होते पण त्यांना पुढे पक्षातून काढण्यात आले होते. १९९१ मध्ये बाबासाहेबांच्या शंभराव्या जयंती निमित्त प्रकाशित झालेले त्यांचे साहित्य देशपातळीवर मोठ्या प्रमाणात वाचण्यात आले होते. बाबासाहेब आम्हाला उशीरा माहित झाले अशी खंत अनेक इतर राज्यातील लोकांनी अनेकदा बोलून दाखविली. माझ्या मत्ते न्या. चंद्रुचा प्रवास मार्कसवादाकडून आंबेडकराकडे झाला आहे. मुळात हा चित्रपट अन्याय व अत्याचारा विरुध्द लढण्याची प्रेरणा देऊन समता स्थापन करण्याची प्रेरणा देतो एवढेच पुरेसे आहे. कुठल्याही विचारधारेत बांधून त्याला मर्यादित करणे अयोग्य आहे. चित्रपटाचे शीर्षक देखील वादाचे कारण ठरत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच आंबेडकरी समाजाचे भावनिक संबंध चित्रपटा सोबत जोडले गेले. सोशल मीडीयावर प्रचार करीत याची अतुरतेने वाट पाहणे सुरु होते. या चित्रपटाणे आपल्याला निराश केले नाही, साऊथ मध्ये अशाप्रकारे चित्रपट बनविण्याची चांगली प्रथा सुरु झाली आहे. जय भीम म्हणजे संघर्षाचे प्रतिक होय म्हणून या चित्रपटाचे शीर्षक ‘जय भीम योग्यच आहे, आपण हा चित्रपट डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावा, एवढीच अपेक्षा.