मुक्तपीठ टीम
कोरोना विषाणुच्या उपचारासाठी लाल मुंगीची चटणी वापरण्याचे निर्देश देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशभरात कोरोनाच्या उपचारासाठी पारंपारिक औषधं किंवा घरगुती उपचारांना मान्यता देऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी स्पष्ट केले की अशी बरीच पारंपारिक औषधं आहेत, सर्वच घरात पारंपारिक औषधोपचार केला जातो. पण या उपचारांचे विपरीत परिणामही भोगावे लागू शकतात, त्यामुळे आम्ही हे पारंपारिक औषध देशभरात लागू करण्यास सांगू शकत नाही.
लाल मुंग्यांच्या चटणीला कोरोना उपचारात मान्यतेसाठी याचिका
- उच्च न्यायालयाने आयुष मंत्रालयाच्या महासंचालकांना आणि सीएसआयआरला कोरोनावर उपचार म्हणून लाल मुंग्याची चटणी वापरण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.
- ३ महिन्यांच्या आत या प्रस्तावावर निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते.
- त्यामुळे निर्माण झालेली विचित्र स्थिती संपवायच्या हेतूने ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
- संविधानाच्या अनुच्छेद १३६ अंतर्गत विशेष याचिकेवर सुनावणी करू इच्छित नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
- त्यामुळे याचिका फेटाळण्यात आली.
लाल मुंगीची चटणी औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याचा दावा
- याचिकेत लाल मुंगीच्या चटणीचे औषधी गुण स्पष्ट करण्यात आले आहेत.
- लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचे मिश्रण करून बनवलेली चटणी ओडिशा आणि छत्तीसगडसह देशातील आदिवासी भागात ताप, खोकला, सर्दी, थकवा, श्वसनाच्या समस्या आणि इतर आजारांवर औषध म्हणून वापरली जाते.
- लाल मुंग्यांची चटणी औषधी गुणांनी समृद्ध आहे, असा दावा करण्यात आला आहे.
- त्यात फॉर्मिक ऍसिड, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि झिंक असते, असे मांडले जाते.
- कोरोनाच्या उपचारांमध्ये हे किती प्रभावशाली आहे याची चाचणी करणे आवश्यक आहे असे याचिकेत नमुद करण्यात आले आहे.
- खंडपीठाने ओडिशाच्या आदिवासी समुदायाचे सदस्य नायधर पाढियाल यांना कोरोना विरोधी लस घेण्याचे निर्देश दिले आहेत.