मुक्तपीठ टीम
जगाला अण्वस्त्र मुक्त करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र चाचणी विरोधी दिवस मुंबईतील कझाकिस्तानच्या मानद वाणिज्य दूत कार्यालयात साजरा करण्यात आला. कझाकिस्तानचे मुंबईतील मानद वाणिज्य दूत महेंद्र के. सांघी यांनी यावेळी बोलताना अण्वस्त्र चाचणी रोखणे व जग अण्वस्त्र मुक्त करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कझाकिस्तानच्या स्वात्रंत्र्याचा ३० वा वर्धापनदिवस यावेळी साजरा करण्यात आला. चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून यावेळी अण्वस्त्र चाचणी विरोधी दिवसाचे महत्त्व दर्शवण्यात आले.
कझाकिस्तानमध्ये १९९१ पर्यंत तब्बल ४५० पेक्षा जास्त अणुचाचण्या झाल्या होत्या. त्याचा मानव जातीवर होणारा दुष्परिणाम पाहता २९ ऑगस्ट १९९१ ला अणुचाचणी बंद करण्याचा निर्णय कझाकिस्तानने घेतला. नज़रबायेव यांच्या नेतृत्वाखाली ८ सप्टेंबर २००६ ला किर्गिस्तान, ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान और उज़्बेकिस्तान यांनी मध्य आशियाई अण्वस्त्र मुक्त विभागासाठी पुढाकार घेतला. त्यामध्ये कझाकिस्तानचे मोठे योगदान होते. कझाकिस्तानचे विद्यमान राष्ट्रपति कासिम – जोमार्ट टोकनेव हे देखील त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत.
नूरसुल्तान नज बायेव फाउंडेशनतर्फे अण्वस्त्र मुक्त जग व जागतिक शांतता पुरस्काराची सुरुवात केली. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशांना हा पुरस्कार दर दोन वर्षांनी प्रदान केला जातो.
२०१२ मध्ये नजरबायेव यांनी एटीओएम योजना (अणु चाचणी समाप्त) सुरु केली. जग अण्वस्त्र मुक्त व्हावे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.
कझाकिस्तानचे भारतातील राजदूत नुरलन झाल्गाबायेव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबवली जात असल्याची माहिती महेंद्र सांघी यांनी दिली. याचाच एक भाग म्हणून चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईतील मानद वाणिज्य दूतावासाने अण्वस्त्र चाचणी विरोधी दिवस व कझाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाचा ३० वा वर्धापनदिन साजरा केला. यावेळी आसिफ नवरोज, स्वागत तावडे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.