मुक्तपीठ टीम
काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरनं मोठा धक्का दिला आहे. शनिवारी काँग्रेसने सांगितले की, राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. मात्र ट्विटरने निलंबनाच्या कारवाईचा इंकार केल्यानंतर पक्षाने स्पष्ट केले की, अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केला होता. त्यावरून त्यांच्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. जे राहुल गांधींच्या बाबतीत घडलं ते कोणत्याही ट्विटरकराच्याबाबतीत होऊ शकते, त्यामुळे तो फोटो ट्विट करून राहुल गांधींनी नेमकी काय चूक केली ते समजून घेणे आवश्यक आहे.
- काँग्रेस पक्षाने ट्विट करत सांगितले की, “राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील… जय हिंद.”
- यावर ट्विटरने प्रतिक्रिया दिली, अकाऊंट सस्पेंड केलेले नाही आणि त्याची सेवा सुरू आहे.
- जेव्हा एखादे अकाऊंट सस्पेंड केले जाते जाते तेव्हा ते ग्लोबल व्यूवरून काढले जाते. यानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या जुन्या ट्विटला कोट केले आणि लिहिले की, अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले आहे.
- सुत्रांचे म्हणणे आहे की राहुल गांधींच्या अकाऊंटवर केलेल्या कारवाईनुसार, ते अकाऊंट लॉगिन करू शकतात, परंतु ट्विट, रिट्विट करू शकत नाहीत आणि कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकत नाहीत.
The account has been temporarily locked. https://t.co/MYqpC8OeIb
— Congress (@INCIndia) August 7, 2021
ट्विटरने राहुल गांधींच्या अकाऊंटवर कारवाई का केली?
- राहुल गांधींनी दिल्लीतील नांगल गावातील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली.
- बलात्कार आणि हत्या झालेल्या ९ वर्षांच्या मुलीच्या पालकांना ते भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबतचे छायाचित्र ट्वीट केले.
- त्यानंतर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने ट्विटर आणि दिल्ली पोलिसांना पत्र पाठवून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
- आयोगाने म्हटले आहे की, कोणत्याही अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाचे फोटो पोस्ट करणे हे बाल न्याय कायदा, २०१५ च्या कलम ७४ आणि बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) कलम २३ चे उल्लंघन आहे.
कायदा काय सांगतो?
- कोणत्याही अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाचे फोटो पोस्ट करणे हे बाल न्याय कायदा, २०१५ च्या कलम ७४ आणि बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक कायद्याच्या (POCSO) कलम २३ चे उल्लंघन आहे.
- कायद्यातील तरतुद आणि न्यायालयाच्या आदेशांनुसार कोणत्याही स्वरुपात पीडितांची ओळख उघड होईल असं काहीही ते हयात असताना किंवा नसताना करण्यावर बंदी आहे.
- पीडितांचे, त्यांच्या नातेवाईकांची, घराची ओळखही उघड करता येत नाही.
- पीडित, त्यांचे नातेवाईक यांचे फोटो, व्हिडीओ अगदी ब्लर करून वापरण्यावरही बंदी आहे.
त्यामुळे राहुल गांधींनी न्याय मिळवून देण्याच्या चांगल्या उद्देशाने उचललेले चांगले पाऊल त्यांनाच अडचणीत आणणारे ठरले आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा उद्देश कितीही चांगला असला तरी बाललैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचार या प्रकरणातील पीडितांची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती, छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका.
ट्विटरवर काँग्रेसचा दुटप्पीपणाचा आरोप
ट्विटरने राहुल गांधींचे खाते लॉक करताना त्यांनी कायद्याचा भंग केल्याची तक्रार पुढे केली आहे. मात्र, राहुल गांधींसारखेच पीडितेच्या नातेवाईकांसोबतच्या फोटोंसहचे ट्वीट राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई न करणं हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.