मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शौर्य पुरस्कार पोर्टल आणि राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसी यांनी एक अनोखी योजना सुरू केली आहे. या योजनेतून संयुक्तपणे सशस्त्र दलांचे वीर जवान आणि देशाच्या सेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांना अभिवादन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या उपक्रमांतर्गत स्वच्छता आणि देखभालीसाठी शूर वीरांच्या पुतळ्यांची निवड करण्यात आली आहे. कॅडेट्स परस्पर संवाद , व्याख्याने, कविता वाचन, पथनाट्य, नृत्य इत्यादी माध्यमातून युद्धातील नायकांचे आणि इतर राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचे योगदान आणि नेतृत्व वैशिष्ट्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतील. आजपर्यंत एनसीसीने १० परमवीर चक्र,६ अशोक चक्र, ११ महावीर चक्र, चार कीर्ति चक्र,१२ वीर चक्र आणि तीन शौर्य चक्र असे ४६ पुतळे दत्तक घेतले आहेत.
शूर-वीरांना कशी देणार मानवंदना?
• एनसीसीचे हे उदात्त कार्य सर्वदूर नेण्यासाठी, गॅलंट्री अवॉर्ड्स पोर्टलने दर आठवड्याला एनसीसीतर्फे आयोजित या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे.
• ज्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही त्यांना पोर्टल (https://www.gallantryawards.gov.in/) आभासी स्वरूपात श्रद्धांजली वाहण्याची संधि देते.
• असा पहिला कार्यक्रम प्रायोगिक आधारावर ७ जुलै २०२१ रोजी थेट वेबकास्ट केला होता.
• पुढील कार्यक्रम १६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता केरळमधील कोची येथील तिरुपुनिथरा येथील स्टेच्यू जंक्शन येथे होणार असून तेथे लेफ्टनंट कर्नल रामकृष्णन विश्वनाथन, वीर चक्र यांच्या पुतळ्यास एनसीसीसीतर्फे श्रद्धांजली अर्पण केली जाईल.
• लेफ्टनंट कर्नल रामकृष्णन विश्वनाथन हे १८ ग्रेनेडियर्सचे ‘सेकंड इन कमांड’ होते. त्यांनी ऑपरेशन विजयदरम्यान कारगिलच्या द्रास क्षेत्रात टोलोलिंग पर्वतावर आणि आजूबाजूला कारवाई केली होती. कारगिल युद्धाच्या वेळी केलेल्या कारवाईबद्दल त्यांना मरणोत्तर वीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमातून दैनंदिन जीवनात ‘स्वच्छते ’ चे महत्त्व आणि स्थानिक स्मारक व वारसा सांभाळण्यासाठी स्थानिक जनतेला प्रेरणा देण्याचा संदेश दिला जातो. तसेच सामाजिक कारणासाठी तरुणांची उर्जा वापरण्यास आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ते योगदान देते. एनसीसीच्या या उपक्रमाला सर्वच घटकांचे प्रोत्साहन लाभले आहे.
तुम्हीही सुचवा…
• आगामी कार्यक्रमांबद्दल माहितीसाठी शौर्य पुरस्कार पोर्टलवर लॉग इन करा.
• स्थानिक एनसीसी युनिटद्वारे दत्तक घेणे आवश्यक असलेल्या पुतळ्याबाबत देखील लोक सुचवू शकतात.
• सूचना पोर्टलवर पाठवता येऊ शकतात.