डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
दिंडी चालत असताना चालणाऱ्या सर्वसामान्य माणसांचेही चित्त हरपून जाते तिथे वारकऱ्यांची काय अवस्था होत असेल? टाळ मृदंगाच्या बोलावर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या तालावर दोन पावले मागे आणि दोन पावले पुढे पडणारी पाऊले दिवसभर कशी थकत नाहीत हे त्या पांडुरंगालाच माहीत. तो तरी काय सांगणार म्हणा? ज्यांच्या त्याच्या तोंडातून त्याचेच नाव बाहेर पडत असते. त्याच्या जोडीला प्रत्येक माणसात प्रत्यक्ष माऊलीला पहाणारा वारकरी एका विशिष्ट क्रमाने अभंग गात असतो. रूपाच्या अभंगानंतर रात्री मुक्कामापर्यंत विशिष्ट क्रमाने अभंग गायले जातात हे आपण पाहिले. रूपाच्या अभंगानंतर मंगलाचरणाचे अभंग म्हटले जातात. त्यानंतर काकड आरत्या, भुपाळ्या, वासुदेव, आंधळे, पांगळे, जोगी, बाळछंद, गवळणी अशा क्रमाने दुपारच्या भोजनापर्यंत अभंग गायले जातात. यातले अभंगाचे काही प्रकार ऐकून नक्कीच बावचळून जायला होत असेल नाही. वासुदेव, जोगी, आंधळे, पांगळे, बाळछंद ही नावे अनेकांनी प्रथमच ऐकली असतील.
आधी प्रपंच करावा नेटका
मग घ्यावे परमार्थ विवेका
प्रपंचाच्या मोहमायेतून सुटका करून परमार्थ साधण्यासाठी नामस्मरण यासारखे दुसरे साधन नाही. आपल्या कडे उपलब्ध असलेल्या वेळातील जास्तीत जास्त वेळ नामस्मरणात व्यतीत केला तर हा परमार्थ साधता येतो. अनेकदा कळतं, पण वळत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. नामस्मरणासाठी वेळ देणे आवश्यक आहे हे समजत असते. पण जीवनाच्या मोहमायेत अडकलेल्या जीवाला हा वेळ कसा काढायचा हे न कळल्याने तो अंधारात चाचपडत असतो. या मार्गावर चालण्याची मनांची पूर्ण तयारी झालेली असते, मार्गक्रमणा सुरुही होते, पण इंद्रिय लोलुपतेने त्या मार्गावरून चालायला मन धजावत नाही, मनाचा पांगळेपणा आडवा येतो.
थोडक्यात जीवनाच्या प्रत्येक गोष्टीकडे पहात असताना त्यातून नामस्मरणाकडे कसे जाता येईल यासाठी ही रुपके वापरली आहेत. वर्णन केलेले हे सारे रुपकात्मक अभंगाचे प्रकार आहेत. संत साहित्यामध्ये सगळ्याच संतांनी अत्यंत आशयगर्भ रुपकांची योजना केली आहे. मनातील क्रिया आणि क्रीडा यांची अभिव्यक्ति संतांनी अशा रुपकात्मक अभंगातून केलेली आहे. तुकाराम महाराजांची रुपके दोन प्रकारची आहेत. खेळावरील (टिपरी, विटीदांडू, हमामा, फुगडी इ..) आणि लोककाव्यात्मक ( पाळणा, गोंधळ, वासुदेव, पांगुळ, आंधळा ई..) आपल्या रोजच्या जीवनात घडणारे घटनांचे व्यवहार या परमेश्वराच्या लीला आहेत. त्याच्या या खेळात त्याने आपल्याला सहभागी करून घेतले आहे. या अशा रचनांमधून महाराजांनी जीवनाचे तत्वज्ञान सोप्या शब्दांत समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
अंध पंगू दृढ जाहलो बांधलो संसारी |
मायामोह भरली नदीमाजी दुस्तर मगरी |
यातून कोण सोडविल नाना परीचे दु:ख भारी |
दैवयोगे भेटला तो जनार्दन गुरुसत्वरी ||
दिंडीत म्हटल्या जाणारे आंधळे, पांगळे हे अभंगाचे प्रकार म्हणजे काय याची कल्पना या वरील अभंगावरून येईल. तसेच तुकाराम महाराजांचा हा पांगूळही बरेच काही सांगून जातो.
पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥१॥
गवळण
सर्व समाजमनाला भुरळ घालणारा प्रकार म्हणजे गवळण. या गवळणीमधून हरीच्या नाना लीला कथन करताना त्याला घातलेली अद्यात्माची घातलेली सांगड मनाला वेगळीच भुरळ घालते. संत साहित्यासोबत लोकसाहित्यातही अत्यंत लोकप्रिय असा हा प्रकार आहे. अनेक गवळणी संगीतबद्ध करून त्याचे ऑडिओ अल्बम बाजारात उपलब्ध आहेत. संत साहित्यात गवळणी लिहिताना हिंदी भाषेतही अनेक गवळणी लिहिल्या गेल्या आहेत आणि त्याही दिंडी सोहळ्यात गायल्या जातात.
पग घुंगरू रे पग घुंगरू बांधकर नाची ||
मै अपने तो नारायणकी | हो गयी आपही दासी ||
विषका प्याला राजाजीने भेजा | पीबत मीरा हासी ||
लोग कहे मीरा भई रे बावरी | बाप कहे कुल नासी ||
मीराके प्रभु गिरिधर नागर | हरिचरणकी दासी ||
भारुडे
हा एक नाट्यात्मक काव्यप्रकार आहे. पूर्वीच्या काळी जनसामान्यांचे मनोरंजन करताना प्रबोधन करणे हा हेतू भारुड रचने मागे होता. एकनाथ महाराजांनी लोकप्रबोधनासाठी भारुडाचा उपयोग केला. तुकाराम महाराज ही उत्तम लोकशिक्षक होते. अनेक गहन विषय साध्या सरळ सोप्या भाषेतून लोकांपर्यंत नेण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी भारुड हा रचनाप्रकार हाताळला आहे. पण यांना तत्वज्ञान समजावे अशी त्यामागे भूमिका होती. त्यांच्या गाथेमध्ये सातच्या आसपास भारुडे आहेत. त्यामध्ये वासुदेव आंधळ्या-पांगळ्या जोहार जोशी गोंधळ वारी सरोदा दर्वेश वागा गावगुंड गौरी टिपरी अशा विविध विषयावर नाट्यात्मक भारुड रचना आहेत.
मला दादला न लगे बाई ।।
मोडकेसे घर । तुटकेसे छप्पर ।।
देवाला देवघर नाही ।।
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)