तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ती भेट तशी नव्हती, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्ष त्यांना तशी काही जबाबदारी देणार नाही असे सांगितल्यामुळे विश्वास ठेवावा असं नाही, पण स्वत: प्रशांत किशोर यांनी बंगालची कामगिरी फत्ते केल्यानंतर यापुढे निवडणूक रणनीतीकाराची भूमिका बजावणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
अर्थात आपल्याकडे प्रत्येक चाणक्याला एका ठराविक टप्प्यानंतर आपणच सम्राट व्हावे असे वेध लागतात. मग गल्ली असो की दिल्ली. अनुभव सारखेच. तसेच प्रशांत किशोरांना रणनीतीकाराऐवजी राजकीय नेतृत्वाचीही महत्वाकांक्षा आहेच. त्यांनी ती लपवलेलीही नाही. बिहारात त्यांनी अयशस्वी प्रयत्नही केला. पण डॉक्टर स्वत:वरच उपचार करत नाहीत, तसेच त्यांना स्वत:साठी तिथे यशस्वी रणनीती ठरवता आली नसावी. पण आता बंगालमध्ये दिल्लीच्या फौजाना चीत करण्यात भूमिका बजावल्यानंतर त्यांना थेट राष्ट्रीय वेध लागल्याचे दिसते आहे. त्यातूनच ते भाजपाविरोधाच्या एक कलमी अजेंड्यावर निघाले असतील, अशी शक्यता आहे. त्यातूनच त्यांची शरद पवारांशी भेट झाली असावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे म्हणजे राजकारणतील चालता बोलता ज्ञानकोश आहेत. त्यांना जीवनातील प्रत्येक विषयाची माहिती असते. आणि ती माहिती मिळवणे आणि पुन्हा ती अपडेट करत राहणे आवडते. त्यामुळे त्यांनी तीन तास प्रशांत किशोर यांच्याकडून बदलत्या निवडणूक रणनीतीतील बरंच काही समजून घेतलं असेलच. तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून आपलं प्रोजेक्शन करत, राष्ट्रीय राजकारणात काहीतरी महत्वाची भूमिका पार पाडण्याची इच्छा दिसत असलेले प्रशांत किशोरही राजकारणातील ज्ञानकोशाकडून काही माहिती, मार्गदर्शन मिळते का ते पाहत असतील. त्यातच दोघे एकत्र येणे म्हणजे २०२४साठी भाजपेतर पक्षांना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्नही असावाच. त्यातून मग शरद पवार हे तर सर्व पक्षांमध्ये संपर्क आणि चांगले संबंध असणाऱ्या दुर्मिळ नेत्यांपैकी एक. त्यातून त्यांनी महाराष्ट्रात जागांच्याबाबतीत नंबर एक असतानाही भाजपाला जे सत्तेबाहेर ठेवले, त्यामुळे देशपातळी वर त्यांच्या कौशल्याबद्दल प्रतिमा उंचावलेली आहे. त्यामुळे त्यांनी जर भाजपेतर पक्षांची राष्ट्रीय मोट बांधण्याचा प्रयत्न केला तर कुणालाही मिळणार नाही, एवढा चांगला प्रतिसाद नक्कीच मिळेल. रणनीतीकार म्हणून भारतीय राजकारणाचा अभ्यास असणाऱ्या प्रशांत किशोरांना एवढं तर १०० टक्के माहित असणार. त्यामुळे त्यांचा तो हेतू असणारच असणार.
शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. अशक्य काहीच नसतं. त्यातही राजकारणात तर नाहीच नाही. पण असे असले तरीही प्रशांत किशोरांची राजकीय भूमिकेत येऊन राबवलेली रणनीती आणि शरद पवारांचे नेतृत्वाखाली इतर सर्व भाजपेतर पक्ष अशी मोट सहजतेने बांधली जाईल. आणि पुन्हा ही मोट भाजपाला सत्तेबाहेर फेकून दिल्लीत आपले झेंडे फडकवू शकेल, एवढं काही राजकारण सोपं नाही. भाजपाही तेवढा लेचापेचा नाही, हे मान्य केलं पाहिजे. २००४ चा भाजपा आणि २०२४चा भाजपा यात केवळ २० वर्षांच्या अनुभवांचे अंतर नसेल तर नेतृत्व, साधने आणि वृत्तीचाही फरक आहे. त्यामुळे भाजपाला २०२४मध्येही सत्तेतून हलवणे तेवढे सोपे नाही.
अशक्य काहीच नसते. त्यामुळे भाजपाला पराभूत करणे अशक्य नाही, पण अवघड नक्कीच आहे. तरीही भाजपाचे नेते मग कासाविस होऊन शरद पवार – प्रशांत किशोर भेटीवर टोमणेबाजी का करत असावेत? भाजपाच कशाला मुख्यमंत्रीपदापुरतीच सत्तेत असलेली शिवसेना आजवर संघटनात्मक पातळीवर सुस्तावलेली होती. तीही आता अचानक सक्रिय झालेली दिसत आहे. काँग्रेस देशभरात कशीही गलितगात्र असेल पण महाराष्ट्रात नाना पटोले हे, मुंबईत भाई जगताप हे झपाट्याने कामाला लागलेले दिसत आहे. हे सर्व प्रशांत किशोरांच्या भेटीमुळे झाले असे नाही. पण त्यानंतर जास्त उघडपणे सर्व सुरु झाले असल्याचे जाणवत आहे, असं का?
माझ्या मते त्याचे कारण स्पष्ट आहे. ते म्हणजे शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे असे त्यांच्या अनुयायांना कितीही वाटत असेल. मराठी माणूस म्हणून आपल्यासारख्या मराठी माणसांनाही तो विचार सुखावणारा असेल. पण प्रत्यक्षात ते सोपे नसल्याची इतर कुणाला जाणीव असो वा नसो खुद्द शरद पवारांना १०० टक्के असणार असणार. तरीही सारं घडतंय त्याचे कारण दाखवण्याचा आणि प्रत्यक्षातील अजेंडा वेगळे असतात तसेच असावे.
शरद पवार थेट पंतप्रधान पदावर बसतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट खासदार निवडून आणणारे पक्ष मान्य करतील असेही नाही. तरीही सध्या राष्ट्रीय लक्ष्य दाखवण्यातून राष्ट्रवादीला महाराष्ट्रीय फायदा मिळवावा, हेच असावे. ते कसं ते समजून घेऊया. सध्या राष्ट्रवादीचे ४ खासदार आहेत. शिवसेनेचे २१ आहेत. सध्या राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत, शिवसेनेचे स्वत:चे निवडून आणलेले ५६ आणि सोबत घेतलेले इतर मिळून साठावर आमदार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नंबर एक व्हायचे असेल तर राष्ट्रवादीकडे मराठी मतदारांनी ओढलं जावं असा भावनात्मक मुद्दा आवश्यक आहे. हा मुद्दा मराठी पंतप्रधानाचा असू शकतो. या एका मुद्द्यावर शिवसेनेसारखा मोठा प्रादेशिक पक्षालाही मागे येण्यास भाग पाडले जाऊ शकते. नव्हे ठाकरेंएवढेच पवारांना मानणाऱ्या शिवसेनेच्या संजय राऊतांकडूनच यूपीए नेतृत्वाबद्दल बोलून सुरुवात करून घेतली गेली असावी. प्रशांत किशोर भेटीनंतर राऊतांचे पद भागीदार दुसरे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी आनंदच व्यक्त करत दुजोरा दिलाच आहे. अर्थात हे सारे उद्धव ठाकरेंना चालेलच असे नाही. पण मराठी पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर त्यांना थेट कडवट विरोध करताही येणार नाही. जर त्यावेळी राष्ट्रवादी सोबत नसली तरीही.
आता घटनाक्रमाकडे पाहूया. कितीही शरद पवार म्हणाले की शिवसेना हा विश्वास ठेवावा असा पक्ष आहे तरी त्यांना स्वत:ला उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीला मान्यता दिली तेव्हा १९७८मधील तरुण शरद पवारांनी पत्करलेला वेगळा मार्ग आठवला असेल. त्यात उद्धव ठाकरे यांनी सातत्याने नरेंद्र मोदींबद्दल आदरपूर्वक, आपुलकीने बोलणे हे राष्ट्रवादीचे नेते दाखवत नसले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांसारखेच त्यांनाही खटकणारे आहे. त्यातूनच मग मोदी आणि ठाकरेंची वेगळी चर्चा संशय निर्माण करणारी वाटली तर आश्चर्य वाटायला नको.
अशा परिस्थितीत जर वेगळं काही घडलं किंवा शिवसेनेबरोबरच एकत्र लढले, शिवसेनेशिवाय लढले तर राष्ट्रवादीसाठी शरद पवारांच्या रुपाने पहिला मराठी पंतप्रधानाचा मुद्दा खूप मोठा ठरु शकतो. शिवसेनाही बरोबर नसली तरी थेट विरोध करू शकणार नाही. कडवा विरोध तर नाहीच नाही. त्यामुळे फायदा हा होईल की महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एक आकडीवरून किमान सन्मानजनक दोन आकडी खासदारसंख्या मिळवता येईलच. पण वाढवलेले बळ आमदारांची संख्या वाढवत राज्यातील क्रमांक एकचा पक्ष बनण्यासाठी उपयोगात आणता येईल. त्यामुळेच दाखवण्याचा अजेंडा जरी राष्ट्रीय असला तरी खरं लक्ष्य हे महाराष्ट्रीयच असावे, असं वाटतं.
इतर राजकीय पक्षांना हे कळत नाही, असे नाही. त्यामुळेच पुढच्या घटना घडू लागल्या असाव्यात. राजकारणात एखाद्याला थट्टेनेही मारले जाते. त्याच्या दाव्यातील हवा काढली जाते. प्रशांत किशोर – शरद पवार भेटीनंतर भाजपाकडून टोमण्यांचा पाऊस सुरु झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘कोणीही कितीही स्ट्रॅटेजी करा, आजही मोदीजीच आणि २०२४ मध्येही मोदीच येणार’, असा खास भाजपा स्टाइलीत टोला लगावला. तर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काहीशा खवचटपणे “२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…” टोमणा मारलाय. त्यातून चेष्टेतच सारं नेत त्याला गंभीरतेने घ्यावं असं काही नाही असं दाखवायचा प्रयत्न असावा. त्यातूनच त्यांनी ते किती गंभीरतेने घेतेले आहे, ते दिसते. अर्थात तेही राष्ट्रीयपेक्षा महाराष्ट्रीय परिणामांची जाणीव असल्यामुळेच असावं.
काँग्रेसचा तर राष्ट्रवादीवर विश्वासच नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले थेट भिडले आहेत. सातत्याने लोकांमध्ये जात आहेत. राष्ट्रवादी घेऊ शकेल असे नाणारसारखे मुद्दे थेट अंगावर घेत आहेत. राष्ट्रवादीचे भुजबळ, मुंडेंसारखे ओबीसी नेते त्यांच्यावरील आरोपांमुळे अडचणीत येऊ शकतील हे ओळखत तीही जागा भरण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यात पुन्हा आता तर थेट आपण मुख्यमंत्रीपदाचेही इच्छूक असल्याचे सांगून त्यांनीही एक भावनात्मक मुद्दा तयार करण्यास सुरुवात केली आहे, हे ते उघड बोलो न बोलो, सारं राष्ट्रीय प्रमाणेच महाराष्ट्रीय लक्ष्य काय असू शकते त्याची जाणीव असल्यामुळेच असावं.
आता उरली शिवसेना. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं पण सत्ता मात्र राष्ट्रवादीला मिळाली. केवळ खात्यांमुळेच नाही तर सर्वच बाबतीत. त्यात काँग्रेसच्या वडेट्टीवारांना अपमानास्पदरीत्या जागा दाखवता तरी येते राष्ट्रवादीत तर नवाब मलिक, राजेश टोपे, आणि सर्वात मोठे अजित पवार थेट जाहीर करतात तरी गप्प बसावं लागतं. अजित पवार आता जाहीर सांगतात, आम्ही राष्ट्रवादीचे बसतो, ठरवतो, मुख्यमंत्री संमती देतात. त्यामुळेच पुढचे वारे ओळखत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी-काँग्रेसची संगत ही अपरिहार्य नाही हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला असावा. त्यातील नरेंद्र मोदींची घेतलेली स्वतंत्र भेट हे मोठं पाऊल असावं. तसंच मोठं पाऊल म्हणजे ज्यांच्यावर काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे प्रवक्ते अशी टीका करतात त्या संजय राऊतांना पुण्यात पाठवून पवारांच्या बालेकिल्ल्यात आवाज द्यायला लावणं. नाहीतर आमदार दिलीप मोहितेंचा विषय एका फोन कॉलमध्ये संपवता आला असता. पण काहीवेळा एक संदेश द्यायचा असतो, तो उद्धव ठाकरेंनी दिला. एकाच दगडात त्यातून अनेक पक्षी मारता आले. खडसेंना तुम्ही घेतलं असलं तरी मुक्ताईनगर आता आमचं हे दाखवण्याचा प्रयत्न नगरसेवकांना प्रवेश देऊन केला असावा असं दिसत आहे.
एकूणच शरद पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या चर्चेतून महाराष्ट्रीय लक्ष्य जास्त साध्य करण्याची रणनीती एका रणनीतीकाराच्या भेटीनंतर सर्वच पक्षांनी गंभीरतेने घेतल्याचे दिसते आहे. त्या भेटीतून काही घडो न घडो, महाराष्ट्रातील राजकारण मात्र ढवळले जाऊ लागले. किंवा त्याचा वेग वाढला एवढं नक्की!