मुक्तपीठ टीम
फायझरच्या कोरोना लसीला कॅनडामध्ये हेल्थ रेग्युलेटरने परवानगी दिल्यानंतर आता अमेरिकेतही मिळाली आहे. कॅनडाप्रमाणेच अमेरिकेतही फायझरची लस १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये वापरण्यास परवानगी मिळाली आहे. युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये, ही लस १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मिळू शकते. या देशांमध्ये १६ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातल्यांना फायझरची लस दिली जात आहे. फायझरने असेही म्हटले आहे की, आता त्यांचे लक्ष ६ महिन्यांपासून ११ वर्षांपर्यंतच्या मुलांवर लसीची चाचणी घेण्यावर असेल. फायझरला भारतात परवानगी मिळाल्यानंतर भारतीय मुलांनाही या लसीचं संरक्षण मिळेल. मात्र, भारत त्यासाठी परदेशी लसींवरच अवलंबून राहावं लागेल असं नाही. भारत बायोटेकच्या को-वॅक्सिनचीही मुलांवर चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर तीही लस भारतीय मुलांसाठी उपलब्ध होईल.
भारतात लहान मुलांसाठी लस उपलब्ध कधी होईल?
१. फेब्रुवारीमध्ये भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन चाचण्यांमध्ये मुलांना समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, ड्रग रेग्युलेटरने हा अर्ज नाकारून असे म्हटले की, प्रथम प्रौढांवर लसीची कार्यक्षमता सिद्ध करा.
२. भारत बायोटेक लवकरच त्यांच्या लसीची चाचणी मुलांवर सुरू करू शकेल. तसेच, गेल्या महिन्यात, भारत बायोटेकने फेज -३ चाचणीचा दुसरा अंतरिम निकाल जाहीर केला आणि म्हटले आहे की, त्यांची लस ७८% पर्यंत प्रभावी आहे. या निकालांच्या आधारावर, अशी अपेक्षा आहे की कोव्हॅक्सिनला मुलांवर चाचणी करण्यास परवानगी दिली जाईल.
फायझरची लस मुलांसाठी किती प्रभावी?
• फायझरचा असा दावा आहे की, त्यांनी १२ ते १५ वर्ष वयोगटातील २,२६० मुलांवर लसीच्या चाचण्या घेतल्या.
• ३१ मार्च २०२१ रोजी जाहीर झालेल्या निष्कर्षांनुसार या वयोगटात ही लस १००% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
• ज्यांना ही लस देण्यात आली त्यांच्यापैकी कोणालाही या विषाणूची लागण झाली नाही.
• चाचणीमध्ये १८ मुलांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु ते सर्व प्लेसिबो गटातील आहेत. प्लेसिबो म्हणजे ज्यांना चाचणीत समाविष्ट केले होते पण प्रत्यक्षात लस दिली नव्हती.
• लवकरात लवकर मुलांना शाळेत पाठविणे सुरु होईल, त्यावेळी मित्रांना भेटू शकतील. घराबाहेर खेळण्यासाठी मित्र आणि कुटूंबासह फिरू शकतील. त्यामुळे बचाव आवश्यक असेल.
मुलांसाठी आणखी कुणाच्या लस?
• अमेरिकेतील फायझर व्यतिरिक्त, मॉडर्ना आणि जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या लसींच्याही मुलांवर चाचण्या करण्यात आल्या आहेत.
• मॉडर्नाच्या लसींच्या चाचणीचे निकाल जूनमध्ये येणे अपेक्षित आहेत.
• जॉन्सन अॅन्ड जॉन्सन लसीचा निकालही त्यानंतर येईल.
• वर्षाच्या अखेरीस दोन्ही कंपन्यांच्या लस सर्व मुलांना उपलब्ध होऊ शकतात.
• अमेरिकेची आणखी एक कंपनी नोव्हावॅक्सनेही १२ ते १७ वयोगटातील ३,००० किशोरवयीन मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे.
पाहा व्हिडीओ: