अंधेरीतील गुलाबी नारायण शेट्टी या ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात अखेर डी. एन नगर पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत गेल्या अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. रशेदुल जोहाद शेख आणि नूरअली अब्दुल सत्तार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वांद्रे येथील शास्त्रीनगरचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवार १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना अलीकडेच वांद्रे पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केली होती, त्यांच्या चौकशीत या हत्येचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी दुजोरा दिला आहे. दोन्ही आरोपींची चौकशी सुरु असून या चौकशीनंतरच हत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे सांगितले.
गुलाबी शेट्टी ही महिला अंधेरीतील वालिया कॉलेजसमोरील गणेश मंदिरावरील पहिल्या मजल्यावर राहत होती. तिला एक विवाहीत मुलगी असून ती अंधेरीतील चार बंगला परिसरात राहते. या दोघांमध्ये वाद असून या वादामुळे ते एकमेकांच्या संपर्कात नव्हत्या. याच परिसरात गुलाबी यांची साडेतीन ते चार चौ. फुटाची एक जागा असून या जागेत एक हॉटेल, झेरॉक्स सेंटर आहे. त्यांच्या मालकाकडून त्यांना दरमाह सव्वादोन लाख रुपये भाडा मिळत होता. तिचे पती नारायण शेट्टी यांचा पूर्वी दारुचा व्यवसाय होता, या व्यवसायात गुलाबी यादेखील त्यांना मदत करीत होत्या. मात्र १९७५ साली त्यांची याच व्यवसायातून हत्या झाली होती. तेव्हापासून त्या एकट्याच तिथे राहत होत्या. त्यांची भाची सुजाता पुरंदर शेट्टी ही अंधेरीतील आंबोली, जय भवानी माता रोडवर राहते. तिने २४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी तीन वाजता त्यांना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन घेतला नाही. वारंवार फोन केल्यांनतर त्या फोन घेत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्या त्यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी त्यांना गुलाबी यांचे हातपाय बांधलेले आणि साडीने गळा आवळून हत्या केल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये पडला होता.
ही माहिती मिळताच डी. एन. नगर पोलिसांसह वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. पोलिसांना घटनास्थळी काहीच संशयास्पद वस्तू सापडली नाही. प्राथमिक तपासात गुलाबी यांचे हातपाय बांधून नंतर साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मारेकर्याने बाथरुममध्ये टाकून पलायन केले होते. याप्रकरणी सुजाता शेट्टी हिने दिलेल्या जबानीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.
घरातील काही रोख रक्कम आणि दागिने चोरीस गेल्याचा संशय आहे, मात्र किती रुपयांचा ऐवज चोरीस गेला याचा तपशील समजू शकला नव्हता. घरात जबदस्तीने प्रवेश केल्याच्या कुठलाही प्रकार समोर आला नव्हते. त्यामुळे मारेकरी गुलाबी यांच्या परिचित असावेत असा पोलिसांचा अंदाज होता. विशेष म्हणजे गुलाबी यांच्या घरासमोरच वर्सोवा पोलीस ठाणे आहे, ही हत्या रविवारी दुपारी ते रात्री पावणेअकराच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले आहे. गुलाबी यांची या परिसरात मोठी प्रॉपटी होती, ही प्रॉपटी विकत घेण्यासाठी एक बिल्डर इच्छुक होता, त्यासाठी त्यांनी त्यांना २५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, त्यातून ही हत्या झाली का याचाही पोलिसांकडून तपास झाला होता. गेल्या अकरा महिन्यांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत होते, याच दरम्यान वांद्रे पोलिसांनी रशेदुल जोहाद शेख आणि नूरअली अब्दुल सत्तार या दोघांना घरफोडीच्या गुन्ह्यांत या दोघांना अटक केली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी गुलाबी शेट्टी यांच्या हत्येची कबुली दिली होती. या कबुलीनंतर ही माहिती डी. एन नगर पोलिसांना देण्यात आली होती, शनिवारी या दोघांचा पोलिसांनी ताबा घेऊन त्यांना हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली होती, याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची आता पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.