मुक्तपीठ टीम
जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. शास्त्रज्ञ याबद्दल नवीन माहिती मिळण्याचा प्रयत्न सतत करत आहेत. जेव्हा पहिली लाट आली तेव्हा शास्त्रज्ञांनी म्हटले की संसर्गहबाधित व्यक्तीने एकदा वस्तूला स्पर्श केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्या वस्तूला स्पर्श केल्यास संसर्गाचा धोका होऊ शकतो. पण नव्या संशोधनानुसार, कोरोना स्पर्शातून नाहीतर श्वासातूनच पसरतो असा दावा करण्यात आला आहे.
अर्थात दहा हजार प्रकरणांमध्ये एका प्रकरणात संसर्ग होऊ शकतो, असेही सांगितल्याने स्पर्शातून संसर्गाचा धोका आहे तो आहेच.
संशोधनात काय सांगतं?
- अमेरिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या संचालकांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, एखाद्या वस्तूला स्पर्श करुन विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता फारच कमी आहे.
- अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, वस्तूच्या स्पर्शाने संसर्ग होण्याचा धोका १०,००० लोकांपैकी केवळ १ आहे.
- सीडीसीच्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या वाढीबरोबरच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
- अशा परिस्थितीत वस्तूवर संक्रमणाचा धोका असतो. परंतु घर किंवा ऑफिसमध्ये वस्तूंच्या स्पर्शाने कोरोनाचा होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
संसर्ग पसरतो तरी कसा?
- सीडीसीच्या अहवालात असे म्हटले आहे की हे नाकारता येत नाही की संसर्ग झालेल्या वस्तूला स्पर्श केल्यास धोका होऊ शकतो. परंतु त्याची शक्यता खूपच कमी आहे.
- मात्र, कोरोनाचा विषाणू श्वासामार्फत अधिक पसरतो.
- अहवालानुसार, कोरोना संसर्गबाधित व्यक्तीच्या नाका आणि तोंडातून फारच लहान थेंब हवेत पसरतात, जे इतरांना संसर्गित करतात. त्यामुळेच मास्क घाला आणि सुरक्षित राहा.
- तज्ज्ञांच्या मते, दूषित किंवा संसर्गित भागाला स्पर्श केल्यामुळे कोणालाही कोरोनाचा धोका झाला आहे याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही.
- असे असले तरीही, स्पर्शातून कोरोना संसर्ग पसरत नाही, यावर विश्वास ठेऊन निष्काळजीपणे वागू नका. १०हजारात एक का होईना प्रमाण आहेच आहे. त्यामुळे आपला परिसर, वस्तू बाधित होण्यापासून वाचवणे, स्वच्छ ठेवणे, हे अत्यावश्यकच आहे.