मुक्तपीठ टीम
एखाद्यावेळेस अपुरी झोप झाल्यास दुसऱ्या दिवशी आपल्या वागण्यावर, आपल्या कामावर त्याचा परिणाम दिसून येतो. तुम्ही रात्री उशीरापर्यंत मोबाईल हातात घेऊन जागता का? उद्या सुटीच आहे, म्हणून उशीरा झोपता? असे असेल तर तुम्ही तुमच्या झोप आणि दिनक्रमाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. जे ५० वर्षांच्या वयात पाच तास किंवा त्याहून कमी झोपतात त्यांना गंभीर आजारांचा धोका २० टक्के जास्त असतो.
जसं अन्न, वस्त्र, निवारा, पाणी हे जीवनावश्यक आहे त्याचप्रमाणे झोपही जीवनावश्यक आहे. पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोप झालेल्या लोकांमध्ये दोन गंभीर आजार होण्याचा धोका ४० टक्के असतो. यामध्ये हृदय आणि किडनी इत्यादी आजारांचा समावेश आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरात महत्त्वाचे जैविक बदल होत असतात. यावरुन झोपेतील बिघाड आपल्या आयुष्यावर किती परिणाम होऊ शकतो याचा अंदाज येईल.
कमी झोपेमुळे शरीरावर होणारे परिणाम
- ५ तासांपेक्षा कमी झोप झाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
- मेंदू शकलेला राहतो आणि थकव्याचे प्रमाण वाढते.
- अचानक चक्कर येते, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
- शरीरात इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
- वजन वाढण्याचा धोका वाढतो.
५०, ६० आणि ७० वर्ष वयोगटातील लोकांनी पाच तास किंवा त्यापेक्षा कमी झोपल्याने दोन किंवा अधिक गंभीर आजारांचा धोका वाढतो. लोकांनी दररोज सात ते आठ तास झोप घ्यावी असा सल्ला डॉक्टरही देतात.