स्वप्नाली आसोले
नमस्कार मित्र मैत्रिणींनो!!!
आज मला एका वेगळ्या विषयावर बोलायचे आहे. किंवा चर्चा करायची असे म्हटले तरी चालेल..
‘सू’ म्हणजेच लघवी.
तुम्हाला आठवतय का लहानपणी आपली आई आपल्या सर्वांना अगदी आठवणीने दर थोड्या वेळाने ‘सू’ करायला लावायची. तिला हे कळतं की आपल्या बाळाने दर काही वेळाने सू केलीच पाहिजे. नैसर्गिक रित्या शरिरात तयार होणारी लघवी वेळेवर शरीरातून बाहेर नाही सोडली तर शरिरावर वाईट परिणाम होऊन आपले बाळ आजारी पडू शकते. ते आजारी पडू नये म्हणून तिची धडपड असायची. मग त्याची आपल्याला सवय लागली. पण मग अत्ता मोठे झाल्यानंतर असे का?? लहानपणी ची ही चांगली सवय आपण का विसरतो? लोकांच्या लाजे खातर आपण आपल्या शरिराची हेळसांड का करायची??
खरतरं हा विषय माझ्या मैत्रीणींशी संबंधित आहे, त्यांना रोज तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्ये बद्दल आहे.. कदाचित काहींना याचे महत्व नाही कळणार, पण ज्या महिलांना रोज या समस्येला सामोरे जावे लागते त्यांना नक्की कळेल मला काय म्हणायचे आहे ते….
मला सांगा की तुमच्या सोबत असे कधी झाले आहे का, की तुम्ही एखाद्या दुरच्या प्रवासाला निघाला आणि प्रवासा दरम्यान तुम्हाला लघवीला जायचे होते पण योग्य जागा उपलब्ध नसल्याने बराच वेळ तुम्हाला लघवी थांबवून ठेवावी लागली? कधी १ तास, कधी २ तास, कधी ४-५ तास सुद्धा. आणि फक्त प्रवासच कशाला अगदी रोजच्या दैनंदिन जीवनात सुद्धा हे कित्येकदा नकळत घडत असते. उदाहरणार्थ- सहज शॉपिंगसाठी म्हणून दिवसभर बाहेर पडल्यावर सुद्धा आपल्याला लघवीला जाण्यासाठी लगेच जागा उपलब्ध होत नाही. बऱ्याच महिलांना नोकरी निमित्त, कामानिमित्त दिवसभर बाहेर रहावे लागते तेव्हाही त्यांना या समस्येला रोज तोंड द्यावे लागते. झालय ना असं?? अहो झालच असणार… कारण हा विषय अगदी कॉमन आहे… पण तो तितकाच गंभीर ही आहे या कडे कोणीही लक्ष देत नाही.
लघवी कोंडून ठेवण्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरिरावर होत असतात जसे की ओटीपोट दुखणे (Pelvic Cramp), मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग(Urinary Tract Infection) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे kidney stone ज्याला आपण मुतखडा म्हणतो, ज्याच्यामुळे kidney failure म्हणजेच किडनी निकामी होण्या सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते.
२०१५ च्या आकडेवारी नुसार भारतात झालेल्या एकूण ४६,८८,००० मृत्यूंपैकी १,३६,००० मृत्यू हे केवळ किडनी निकामी झाल्यामुळे झाले आहेत. २००१-०३ मध्ये जे प्रमाण २.१% होते ते २०१०-१३ दरम्यान वाढून २.९% वर पोहोचले. अजून एका अभ्यासातून हे समोर आले आहे की भारतातील एकूण लोकसंख्येच्या १२% लोकांना मुतखडा होण्याचा धोका आहे. मुतखडा हा आजार वरवर साधा वाटत असला तरी याचे काही दिवसांनी शरिरावर वाईट परिणाम होऊ शकतात. काही दिवसांनी किडनी निकामी होऊन मृत्यू देखील ओढवला जाऊ शकतो.
या पेक्षा वाईट परिस्थिती वयस्कर महिलांवर ओढवते, खासकरून ज्यांना मधुमेहा सारखे आजार असतात. यात त्यांना वारंवार लघवीला जावे लागते पण जेव्हा त्या कुठे बाहेर असतील तेव्हा त्यांनाही बराच वेळ लघवी कोंडून ठेवण्या पलिकडे पर्याय नसतो.
पण मग हे असेच चालू रहाणार का? किती दिवस? आणि का सहन करायचे? कितीही झाले तरीही हा एक अपुऱ्या सोईसुविधा मुळे सामान्य जनतेला भोगावा लागणारा गंभीर स्वरूपाचा त्रास आहे ज्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे.
असे अजिबात नाही की यावर काहीच उपाय नाहीत. तुम्ही आम्ही सर्वानी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन या प्रश्नावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर अनेक लोकांचे, खासकरुन महिलांचे ज्या अगदी नकळत या सगळ्याला बळी पडत आहेत त्यांचे प्राण वाचवता येऊ शकतील. बरोबर ना? तुम्हाला काय वाटते??
(अध्यक्ष- सू फाऊंडेशन, उपाध्यक्ष- चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस)
होय बरोबर आहे याकडे कोणीही लक्ष वेधले नाही हे गरजेचे आहे
हो नक्की याचा विचार केला गेला पाहिजे
याकडे दुर्लक्ष होते
या गोष्टीचा ही गांभीर्याने विचार केला पाहिजे