मुक्तपीठ टीम
टीआरपी घोटाळ्यानंतर स्थगित करण्यात आलेले न्यूज चॅनल रेटिंग पुन्हा सुरु झाले आहे. या वर्षाच्या गेल्या म्हणजे १०व्या आठवड्याचे रेटिंग आज जाहीर झाले आहे. टीव्ही ९ मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ ठरले आहे. तर झी २४ तास दुसऱ्या क्रमांकावर आले आहे, तर सातत्यानं नंबर १ असणारे एबीपी माझा न्यूज चॅनल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?
- मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.८ % वाट्यासह टीव्ही ९ मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ ठरले आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर २६.४ % वाट्यासह झी २४ तास आहे. चांगलीच मुसंडी मारली आहे.
- एबीपी माझा १८.७ % बाजार वाट्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- चौथ्या क्रमांकावर साम टीव्ही १२% बाजार वाट्यासह आहे.
- पाचव्या क्रमांकावर ८.५ % बाजार वाट्यासह न्यूज १८ लोकमत आहे.
- सहाव्या क्रमांकावर नव्यानं सुरु झालेलं लोकशाही न्यूज चॅनल ५.७ % बाजार वाट्यासह आहे.
समजून घ्या कोणाचं कसं?
- मराठी न्यूज चॅनलच्या रेटिंगमध्ये टीव्ही ९ आणि एबीपी माझामध्ये सातत्यानं स्पर्धा असते. दोन्ही चॅनलपैकी एक चॅनलच सातत्यानं नंबर १वर असतं. त्यातही एबीपी माझा गेल्या १४ वर्षात बहुतांश वेळा पहिल्या क्रमांकावर विराजमान राहिलं आहे. मात्र टीआरपी ब्रेकनंतरच्या या वर्षाच्या १०व्या आठवड्याच्या रेटिंगमध्ये टीव्ही ९ ने बाजी मारली आहे. टीव्ही ९ मराठी चॅनल क्रमांक एकवर दिमाखात आरुढ झालं आहे.
- झी २४ तासने चांगली मुसंडी मारल्याचे दिसत आहे. फ्री टू एअर चॅनल असणाऱ्या टीव्ही ९ मागोमाग पे चॅनल असूनही २४ तासने दुसरे स्थान पटकावलं आहे. दोघांमधील फरक हा फक्त २ .४ टक्क्यांचा आहे.
- तर एबीपी माझा १८.७ % बाजार वाट्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनेकदा मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात काहीवेळा एबीपी माझा मागे फेकला जातो. मात्र, काही आठवड्यातच पुन्हा हे चॅनल पुढे जात असतं. यावेळी मात्र फरक दहा टक्क्यांचा आहे.
- चौथ्या क्रमांकावरील साम टीव्हीचा १२ टक्के हा बाजारातील वाटा आहे. त्यांचे वितरण लक्षात घेता तो वाईट म्हणता येणार नाही.
- पाचव्या क्रमांकावरील न्यूज १८ लोकमत चॅनेल अवघ्या ८.५ टक्के बाजार वाट्यावर रेंगाळले आहे. तेही पे चॅनल आहे.
- मराठी न्यूज चॅनलच्या बाजारातील नवा खेळाडू असणारे लोकशाही न्यूज चॅनल सहाव्या क्रमांकावर आहे. या आठवड्यातील त्यांचा बाजार वाटा ५.७ आहे. त्यांचे वितरण चांगले आहे.