Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
in सरळस्पष्ट
0
राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट वेध

 

राज ठाकरे काय करणार? राज ठाकरे कुणासोबत जाणार? राज ठाकरे मराठी माणसांचं ऐकणार? राज ठाकरे सत्तेकडे जाणार? राज ठाकरे महाराष्ट्राच्या मनातील करणार? राज ठाकरे महाशक्तीचं स्क्रिप्ट वापरणार? राज ठाकरे ठाकरे ब्रँड टिकवणार? राज ठाकरे ठाकरेंसारखं वागणार की शिंदे, पवारांचा कित्ता गिरवणार?

 

पाहा व्हिडीओ

 

एक नाही अनेक प्रश्न…राज ठाकरेंबद्दल. सतत चर्चेत असलेले. सतत मराठी माणसांना मराठी मनांना अस्वस्थ करणारे. राज ठाकरे काय करणार, हे विचारणारे! खरंतर एकजूट दोन भावांची, दोन पक्षांची. पण प्रश्न विचारले जात आहेत ते फक्त आणि फक्त राज ठाकरेंनाच. कारण स्पष्ट आहे. यापूर्वी राज ठाकरे टाळी द्यायला हात पुढे करायचे तरी उद्धव ठाकरे हात पुढे करण्यात कंजुशी करायचे. यावेळी पहिल्यांदाच असं झालं की राज ठाकरेंनी टाळीसाठी काहीसा हात पुढे करताच उद्धव ठाकरे एक नाही दहा हातभर पुढे धावले, त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला, आता एवढे दिवस झाले तरी तो पुढेच ठेवला आहे. उद्धव ठाकरेच नाही, संजय राऊत, आदित्य ठाकरे सारे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ठाकरी युतीसाठी कमालीचा उत्साह दाखवत आहेत. तर त्याचवेळी मनसेचे अमेय खोपकर, संदीप देशपांडे मात्र अभद्र युती नको वगैरे म्हणत आधीची सल मनात कायम असल्याचं दाखवू लागले. अर्थात याआधी दोन वेळा उद्धव ठाकरेंनी काडीची किंमत दिली नव्हती. संपलेला पक्ष म्हणून काहींनी हीणवलं होतं. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. इगोपेक्षा अस्तित्व मोठं असतं. अस्तित्वच नसेल तर इगो असणार कुठून, आणि असला तरी त्या पोकळ इगोला विचारतं कोण? यावेळी ठाकरे ब्रँडलाच धोका आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी ठाकरी बाण्यानंच ठणकावलं. कुणाला वाटत असेल शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड महाराष्ट्रातून पुसून टाकू, तर भाजपाचं महाराष्ट्रातील नामोनिशाण महाराष्ट्राच्या धरतीवरून पुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनीही ठाकरे ब्रँडला निर्माण झालेला धोका ओळखला. त्याबद्दल ते ठाकरी बाण्यानं बोलले. दोन्ही बंधूंचा मूळ ब्रँड एकच. ब्रँड ठाकरे. मराठी माणूस जीवापाड प्रेम करतो, सर्व सहन करूनही निष्ठेनं आपलं म्हणतो तो ब्रँड ठाकरे. तोच ब्रँड धोक्यात आल्याचं ओळखत दोन्ही ठाकरे बंधू जर ब्रँड संपवणाऱ्यांनाच संपवायचं बोलत असतील तर मग एक होण्यास हरकत काय? पण तसं मनसेकडून फार उत्साहानं दिसत नाही. एक फरक मात्र दिसला. राज ठाकरेंचे हनुमान संदीप देशपांडे म्हणाले, सध्या मनसे कुणा बरोबर युती करणार या पेक्षा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आड मार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे त्याला विरोध करणं आणि नुसता विरोध नाही तर सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन टोकाचा विरोध करणं. भाषा जगली तरच आपण जगू. त्यांच्या या एक्स पोस्टला मी सकारात्मक मानतो. किमान मराठी भाषा जगली तर आपण जगू, सर्व मराठी माणसांनी एकत्र येण्याविषयी ते बोलले. याचाच पुढचा भाग ठाकरे ब्रँड जगला तर शिवसेना, मनसेत बहुसंख्यांचं राजकारण जगेल. हे लक्षात घेत, तसं बोलत, तसं वागण्याचा असेल, ते राजकीय शहाणपणाचंही ठरेल.

 

मुद्दा एवढाच आहे की तसं घडेल का?  उदाहरण गंमतीदार आहे. पण गंभीरतेनं ऐका एक निष्ठेचं नातं असतं आणि दुसरं फ्लर्टिंगचं. ज्याचं त्यानं ठरवावं. पण त्याचा परिणाम गंभीर घडत असतो. का कुणास ठाऊक आजवर राज ठाकरे, त्यांची मनसे यांच्यासोबत फ्लर्टिंगच खूप होत आलं आहे. २०१४पासून भाजपा मनसेशी फ्लर्ट करू लागली. २०१९ला राज ठाकरे त्यापासून दूर झाले, पण पुन्हा मूळ मार्गावर गेले. भगवाधारी झाले. त्यात २०२४ पुन्हा भाजपाशी फ्लर्ट. एकनाथ शिंदेंही पुढे सरसावले. भाजपाप्रमाणेच शिंदेंच्या शिवसेनेचंही मनसेशी फ्लर्ट करणं सुरु झालं. २०१४आधीच टीम मोदीकडून मोदी सत्ता पर्वाची तयारी सुरु झाली होती. राज ठाकरे महाराष्ट्रातील ब्रँड मोदीचे पहिले ब्रँड अँम्बेसिडर. भाजपाची महाराष्ट्रात शिवसेनशी युती. मात्र, गुजरातमध्ये भाजपाचे स्टेट गेस्ट कोण तर राज ठाकरे. भाजपासोबत शिवसेना, पण मोदींच्या गुजरात विकास मॉडेलचं, कारभाराचे गोडवे कोण गाणार तर राज ठाकरे. कोणत्याही भाजपा नेत्यापेक्षाहरी प्रभावीपणे राज ठाकरे यांनी मोदी मोदी करत मोदींचं नेतृत्व, कर्तृत्व घराघरात पोहचवलं. लोकसभा गेली. विधानसभा आली. भाजपाने ऐनवेळी शिवसेनेला दूर केलं. पण सोबत मनसेला काही घेतलं नाही. भाजपा नेत्यांचं मनसे, राज प्रेम फक्त बाइटपुरतंच दिसत राहिलं. २०१९तर सोडून द्या. तेव्हा राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडीओ करत वेगळं अस्तित्व दाखवलं. पण काँग्रेस मविआकडूनही पदरात काही नाही पडलं. पण तिथं फ्लर्टपेक्षा राज ठाकरेंचा दिल जले अवतार जास्त दिसला. भाजपाला, नरेंद्र मोदींनी खोटारडे ठरवत खुजं करण्याचा. पण तसं काही झालं नाही. २०२४च्या आधीपासून मनसे आणि राज ठाकरे भगवाधारी झाले. मारुती स्त्रोस्त्र सोडत हनुमान चालिसाचा जप केला. कडवटपणे मशिदींवरील भोंगे हटवण्याचं बजरंग दलछाप आक्रस्ताळ्या हिंदुत्वाचं आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंना ताप दिला. वाटलेलं आता एकटी भाजपा मनसेला सोबत घेईल. पण भाजपाची स्क्रिप्ट राज ठाकरे, मनसेसाठी फ्लर्टच्या पुढची नव्हती. एकनाथ शिंदे फुटले. उद्धव ठाकरे पदावरून गेले आणि आंदोलनही गेलं. भाजपाचं फ्लर्टिंगही कमी झालं. पुढे अजित पवार फुटले. आणखी महत्व कमी झालं. पुढे तर राज ठाकरेंचे दोस्त आशिष शेलार मनसेलाच डोळे दाखवू लागले. संदीप देशपांडेंनी जाहीर भाषणात हल्लाबोल करत वात्रटिका वाचली. टोकाच्या फ्लर्टिंगपासून टोकाच्या विखाराचा प्रवास वेगानं झाला. प्रकाश महाजन आणि राणे वादात तर मनसैनिकांची विचित्र गोची झाली.

 

महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरेंना विचारणा झाली. त्यांनी मराठी हितासाठी सारं विसरण्याची तयारी दाखवली. त्याच दिवशी सायंकाळी भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, अटीशर्तीनिकष सांगितले. महाराष्ट्राचा द्रोह करणाऱ्यांशी जेवणावळी नको असं बजावलं. मात्र त्यानंतरही एकनाथ शिंदेंना घरी बोलवणं, देवेंद्र फडणवीसांना फाइव्ह स्टारमध्ये भेटणं सुरुच आहे. राज ठाकरे राजकीय नेते आहेत. आपलं महत्व आपल्या उपद्रवशक्तीमुळे हे ओळखून आहेत. ते सर्व थांबवतील असं शक्य नाही. उद्धव ठाकरेंनाही तेवढं कळत असावंच. त्यांनी त्यामुळेच षण्मुखानंद सभागृहातील वर्धापनदिन मेळाव्यात पुन्हा महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते करण्याची तयारी दाखवली. आता मुद्दा एवढाच आहे की राज ठाकरे काय करणार?

 

फ्लर्ट करणारे समोरच्या व्यक्तीला वाट्टेल ते आश्वासन देतात. तिला गोंजारतात, तिला मोहवतात, तिच्यासमोर स्वर्ग उभा ठेवतात…पण उपयोग संपला की फेकून देतात. खूप तकलादू असतं फ्लर्टिंगचं नातं. मुळात ते नातं नसतंच, ते फ्लर्टिंगच असतं. वापरून घेणंच. त्यामुळे आता राज ठाकरे आणि मनसेनं गंभीरतेनं ठरवलं पाहिजे, करायचं काय? भाजपा, शिंदेंची शिवसेना यांना फ्लर्ट करू द्यायचं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी निष्ठेचं नातं जोडत मजबूत व्हायचं. अर्थात भाजपा महायुतीसोबत जाण्यात, त्यांचं ऐकून स्वतंत्र लढण्यात सत्तेचे सुरक्षा आणि सुखाचे फायदे आहेत. पण त्यामुळे ब्रँड ठाकरेचं महत्व कमी होईल, एवढं नक्की. तेही राज ठाकरेंचं महत्व तर आणखीच कमी होईल. ठाकरे बंधू एकत्र आले तर ब्रँड ठाकरे मजबूत होईल. मुंबई मनपावर भगवाही फडकू शकेल. भविष्यातील वाटचालीचा दुरगामी विचार करता तसं करणं फायद्याचं असेल. पण सध्या राजकाऱणात दूरचा विचार करतं कोण? सर्वांना झटपट पटपट खटपट करून काही मिळवायचं असतं. धोका एकच झटपट करताना मनसेचं इंजिन वेगानं पुढे जाण्याऐवजी रुळावरून घसरू नये. सध्या तरी भीती तीच दिसते.


Tags: मनसेशी फक्त फ्लर्ट केलं गेलं...आता राज ठाकरे फ्लर्टवाल्यांना टाळत गंभीरतेनं निष्ठेच्या नात्याकडे वळणार? उद्धव ठाकरेंच्या आधीच्या चुका विसरत ते म्हणाले तसे मराठीराज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे? २०१४ ते २०२४ राज ठाकरे
Previous Post

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

Next Post

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

Next Post
सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!