डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
पालखी सोहळ्याचा रोजचा कार्यक्रम खूपच नियोजनबद्ध असतो. माऊलींच्या पादुकांची सकाळी षोडशोपचार पूजा होत असताना वारकरी आपली तयारी करून निघण्याच्या तयारीत आपापल्या दिंडीच्या ठिकाणी येऊन उपस्थित रहातात. पूजेनंतर अभिषेक, नैवेद्य आणि आरती होते. यानंतर जगकल्याणार्थ पसायदान म्हटले जाते. नंतर नैवेद्यानंतर सोहळ्यातील दोन्ही घोडे माऊलीला अभिवादन करतात त्यानंतर वारीचे पुढील मुक्कामाकडे प्रस्थान होते.
दिसताना वारी जरी रूपरेखा हीन दिसत असली तरी वारी हा अत्यंत नियोजनबद्ध सोहळा आहे. वारी सुरू होण्यापूर्वी निदान तीन महीने वारीच्या मार्गाची पहाणी होते. रस्त्यांची अवस्था, मुक्कामाची व्यवस्था, थांबे, वीज-पाणी, औषध व्यवस्था यांची सगळ्यांची चाचपणी होते. असलेल्या त्रुटी निवारण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिले जातात. चैत्र एकादशीला पंढरपूर येथे बैठक होऊन सोहळ्याची तिथिवार आखणी होते. सासवड, लोणंद, फलटण येथे कधी एक तर कधी दोन मुक्काम असतात. तिथी वृद्धी, क्षय यांचा विचार करून आखलेला कार्यक्रम एक महिना आधी प्रकाशित होतो. त्यानुसार त्या वर्षीची वारी होते.
हैबतबाबा आरफळकरांचे वंशज हे वारीचे मालक असतात. तसेच घोडे आदी इतर सुविधा देणारे शितोळे सरकार आणि पंढरपूरचे वासकरांचे वंशज सोहळ्याचे प्रमुख मानकरी असतात. संपूर्ण वारीत शितोळे सरकारांच्या पालात विश्वस्तांच्या बैठका होऊन महत्वाचे निर्णय घेतले जातात. संपूर्ण सोहळ्याची वाटचाल माऊलीचे चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते. मुक्कामाच्या ठिकाणी चोपदार चोप ऊंच करून हाळी देतो तेव्हा संपूर्ण सोहळा अगदी निशब्द होतो.
वारी जरी नियोजनबद्ध चालत असली तरी प्रत्येकवेळी येणाऱ्या नवनवीन आव्हानांना तोंड देणे आवश्यक असते. काहीवेळा प्रशासनाकडून, काहीवेळा इतरांकडून चुका होत असतात. काही वेळा शब्दाने शब्द वाढत जातो. होणाऱ्या या तक्रारींचे निराकरण रात्रीच्या सामूहिक आरतीनंतर होते. ज्या दिंडीची काही मागणी किंवा तक्रार असते ती दिंडी टाळ वाजवून आपले म्हणणे मांडतात. सोहळा प्रमुख त्याचा सारासार विचार करून चोपदारा मार्फत दिंडीला निर्णय पोहोचता केला जातो.
सर्वसाधारण अडीचशे किलोमीटरचे अंतर दिंडी वीस दिवसांत पूर्ण करते. काही मुक्काम अंतराच्या दृष्टीने अगदी जवळ जवळ आहेत, तर काही लांब आहेत. मुक्कामावरून पालखी निघाल्यानंतर चार-पाच किलोमीटरवर पहिला विश्राम घेतला जातो. तिथून पुढे तेवढ्याच अंतरात दुपारचा भोजनाचा विसावा असतो. पादुकांना दुपारचा नैवेद्य दाखवल्यानंतर जेवणाच्या पंगती बसतात. भोजनोत्तर चार-पाच किलोमीटरवर संध्याकाळचा विसावा असतो. आणि शेवटी रात्रीच्या मुक्कामी पालखी पोहोचते. प्रत्येक विसाव्याच्या ठिकाणी पालखीसाठी सुंदर आकर्षक मेघडंबरी बांधल्या आहेत. मुक्कामाच्या पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी येऊन माऊलीच्या पादुकांच्या दर्शनाचा मनसोक्त लाभ घेतात. आपल्या टोपलीत तुळशी आणि दवणा विकणारी मंडळी दिसली की पालखीचा मुक्काम कुठेतरी जवळच आहे हे बिनदिक्कत ओळखावे.
होय होय वारकरी | पाहे पाहे रे पंढरी ||१||
काय करावी साधने | फळ अवघेची येणे ||२||
अभिमान नुरे | कोड अवघेची पुरे ||३||
तुका म्हणे डोळा | विठो बैसला सावळा||४||
तुकाराम महाराजांनी वारीचे वर्णन करताना सांगितले आहे. हे वारकऱ्यांनो, आपली वारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आहे. भक्तिमार्गात इतर साधनांची काय गरज? नामस्मरणाचे फळ तुम्हाला यामुळेच मिळते. मनात असलेला वृथा अभिमान गळून पडतो. मनीच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतात. सगळ्या चराचरामध्ये विठ्ठलच दिसतो.
वैष्णव धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस एकाच पातळीवर असतो. इथे कोणी राव नाही कोणी रंक नाही. कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. म्हणूनच दोन वैष्णव भेटले की सर्वप्रथम गळाभेट घेऊन एकमेकांच्या पायाला हात लावून नमस्कार केला जातो. समोरच्या कडे नतमस्तक झाले की मनातला अहंकार आपसूक गळून जातो. अगदी लहानात लहान वैष्णवाला मोठ्यात मोठा वैष्णव पायाला स्पर्श करताना दिसतो, हे वैष्णव धर्माचे वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. हेच व्रत हा वैष्णव, आपला धर्म म्हणून पाळतात.
यारे यारे लहान थोर।
याती भलते नारी नर।
करावा विचार।
न लगे चिंता कोणाची।।
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)