डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ||
आइका जी तुम्ही भक्त भागवत | कराल ते हित सत्य करा ||
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||
तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुखदु:ख भोग पावे ||
अठरा पगड जातीचे लोक या दिंडी सोहळ्यात चालत असतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या ब्रीदवाक्याला स्मरून दिंडीचा प्रवास सुरू असतो. स्पृश्य अस्पृश्यतेला दिंडीत वाव नसतो.
दररोज पालखीच्या प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी माऊलीच्या चांदीच्या पादुकांची षोडशोपचार पूजा पालखीच्या तंबूत होते. माऊलीच्या तंबूसमोर वारकरी ठराविक अभंग गात असतात. त्यामुळे वातावरणात वेगळाच उत्साह भरलेला असतो. पूजेचे ब्राम्हण षोडशोपचार पूजेचे मंत्र म्हणत असतात. शितोळे सरकारतर्फे नैवेद्य दाखवला की पालखी प्रस्थानाला सज्ज होते. बाहेर कर्णा झालेला असतो, वारकरी आपापल्या नंबरांप्रमाणे दिंडीत उभे असतात. या वारकऱ्यांची उभे रहाण्याची विशिष्ट पद्धत आहे.
सगळ्यात पुढे पताका म्हणजेच झेंडेकरी, त्यानंतर टाळकरी, मध्ये पखवाज वादक, मागे तुळशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेल्या स्त्रिया आणि सगळ्यात शेवटी विणेकरी. या उभे राहाण्यालाही विशिष्ट शिस्त आहे ठराविक भक्त एका रांगेत अशा रांगा करून पहिल्या ते शेवटच्या दिंडीपर्यंत वारकरी उभा असतो. यालाही हैबतबाबांच्या लष्करी शिस्तीचा स्पर्श झालेला दिसून येतो. पहिल्या वारकऱ्यांपासून ते अखेरच्या वारकऱ्यापर्यंत कवायतीला उभे असलेल्या सैन्याप्रमाणे वारकरी उभे असतात.
वारकऱ्यांच्या खांद्यावर असलेल्या पताकेला जरी भगवी पताका म्हटले असले तरी याचा भगवा रंग थोडा वेगळा आहे. मांजरपाटाच्या कापडावर कावेने सारवल्यावर जो रंग तयार होईल अशा रंगाची ही पताका आहे. अत्यंत साधेपणाने मातीशी असलेली आपली नाळ विसरू नये म्हणून या रंगाची योजना केली असावी. दिंडीच्या विसाव्याच्या ठिकाणा व्यतिरिक्त वारकरी आपली दिंडी सोडत नाही. पण शरीरधर्मासाठी दिंडी सोडण्याची वेळ आली तर त्यांना दिंडी ओळखता यावी म्हणून या झेंड्याला काही फुलमाळा किंवा तत्सम ओळखीच्या खुणा लावलेल्या असतात. वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी तुळस किती उपयुक्त आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. दिंडीच्या मागची ही तुळशी वृंदावने वारकऱ्याला शुद्ध प्राणवायु पुरवीत असतात. डोक्यावर हंडा घेऊन चालणाऱ्या स्त्रिया अभंग म्हणून सुकलेल्या गळ्यांना पाण्याचा पुरवठा करीत असतात. बदलत्या काळानुसार बदलणाऱ्या दिंडीने बिसलेरीचा सहारा घेतला असला तरी आजही परंपरेने मोकळे का होईना हंडे डोक्यावरून वाहून नेले जातात. दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्याचे प्रमुख जातात असतात. दिंडीत जमा होणाऱ्या जनसंख्येचा अंदाज घेऊन प्रशासनाकडून पाण्याच्या टँकर्सची सेवाही सोहळ्यात पुरवली जाते.
दिंडीच्या सगळ्यात शेवटी विणेकरी असतो. शेवटचा विणेकरी दिसला म्हणजे ती दिंडी संपाई असा संकेत असतो. पताका धारकापासून ते विणेकऱ्यांपर्यंत दिंडी अखंड रहावी हा या वारकऱ्यांचा उद्देश असतो. रस्त्यातले हौशे, नवशे, गवशे रस्ता ओलांडताना मधूनच दिंडी मोडून जाताना अनेकदा त्यांना वारकऱ्यांकडून चांगलाच प्रसाद मिळतो. प्रत्येक दिंडीसाठी विणेकरी आणि त्यांची वीणा याचे अनन्य साधारण महत्व असते. या विणेला कधीही जमिनीवर ठेवले जात नाही. विसाव्याच्या ठिकाणी एकमेकांच्या आधाराने गोल करून उभ्या केलेल्या पताका आणि त्याला लटकणारी वीणा हे दृश्य फारच विलोभनीय दिसते.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)