उदयराज वडामकर / कोल्हापूर
झुंजू मुंजू झाले…कोंबड्याने बांग दिली आणि वासुदेवाची स्वारी गल्लीमध्ये गाणे गात आली. वासुदेव म्हणजे सकाळ प्रसन्न करणारी एक हवीहवीशी परंपरा. पुण्याच्या ग्रामीण भागातील वासुदेव महाराष्ट्रभर फिरतात आणि दिवसाची मंगलमय सुरुवात करतात.
वासुदेव म्हटले की डोक्यावर मोर पिसाची छानशी टोपी, टोपीवर एखाद्या देवाची मूर्ती, हातात टाळ, गळ्यात वेगवेगळ्या रुद्राक्षाच्या माळा , भाळी टिळा आणि मुखी देवाचं नाव. पांडुरंग ,श्रीकृष्ण ,महादेव अशी देवाधिकांची नाव घेत ही स्वारी दारोदारी फिरते. सकाळ जागवते. प्रसन्नता पसरवते.
बारामतीवरून आलेला असेच एक वासुदेव सध्या कोल्हापुरात फिरत आहेत. आपल्या दिव्यांगत्वावर मात करीत ते लोकांना जागवतात. पिढ्यानपिढ्या हे वासुदेव सणासुदीच्या दिवसांमध्ये जास्त दिसतात. दिवाळीच्या काळात या वासुदेवांचं गल्लोगल्ली दर्शन घडतं. दारावर तांदूळ, धान्य किंवा पैसे घेऊन आपली उदरनिर्वाह करतात. वासुदेव हे जुन्या युद्ध काळी वेगवेगळी सोंगे घेऊन माहिती काढण्याचे काम करीत असत.
काही महिन्यांपूर्वी मुक्तपीठच्या अपेक्षा सकपाळ यांनीही अशाच एका वासुदेवांशी मुंबईत संवाद साधलेला. त्यांचं जीवन जाणून घेत मांडलेलं. तेही पुण्याच्या बारामती परिसरातील होते. परंपरा जपण्यासाठी आम्ही परवडो न परवडो हे काम करतो, असंही ते म्हणालेले.
वासुदेव मग ते कोल्हापुरातील असो की मुंबईत फिरणारे, खंत एक समान होती. ती म्हणजे, लोककलाकार असूनही राज्य सरकार काही मदत करत नसल्याची. आता तरी सरकार त्यांना मदत करणार का? सरकारी मदतीची गुड न्यूज त्यांना लवकरच मिळावी, या टीम मुक्तपीठच्या शुभेच्छा!