मुक्तपीठ टीम
सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा गुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. अचानक गाय ट्रेनसमोर आल्याने या ट्रेनचा पुढचा भाग तुटला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. अपघातानंतर ट्रेन जवळपास २६ मिनिटे स्टेशनवर थांबवण्यात आली होती. अपघातानंतर काही वेळातच मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस आपल्या इच्छित स्थळी रवाना करण्यात आली.
शनिवारी सकाळी ८.१७ वाजता हा अपघात झाला. त्यावेळी ट्रेन अतुल रेल्वे स्थानकावरून जात होती. अपघातानंतर ट्रेन जवळपास २६ मिनिटे स्टेशनवर उभी होती. सकाळी ८.४३ च्या सुमारास ती इच्छितस्थळी रवाना झाली. या धडकेत वंदे भारत एक्सप्रेसचे कपलर कव्हर आणि बीसीयू कव्हरचेही नुकसान झाले आहे. रेल्वेचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. ट्रेनचा वेग जास्त असल्याने एक बोगीही धक्क्याने वेगळी झाली.
याआधीही झाले होते अपघात-
या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी या ट्रेनला दोनदा अपघात झाला होता. मुंबईहून अहमदाबादला जाणार्या वंदे भारतची वाटवा आणि मणिनगर स्थानकाजवळ म्हैशींच्या कळपाला धडकली होती. यानंतर वडोदरा विभागातील आणंदजवळ एक गाय या ट्रेनला धडकली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.
देशाची पहिली हायस्पीड रेल्वे !!
- वंदे भारत ही मुंबई आणि गांधीनगर दरम्यान धावणारी देशातील तिसरी सेमी हायस्पीड ट्रेन आहे.
- वंदे भारत अपघात प्रतिबंधक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर रोजी या मार्गावरील ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
- तिचा वेग ताशी १८० किमी आहे. भविष्यात हा वेग ताशी २०० किमी करण्याचा विचार आहे.
- वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची सुरक्षा व आरामावर खास लक्ष्य देण्यात आले आहे.
- सीसीटीव्ही कॅमेरे व वायफाय सुविधेसह अपग्रेडेड ट्रेनमध्ये ३ तासांचे बॅटरी बॅकअपही देण्यात आले आहे.