मुक्तपीठ टीम
अमेरिका आणि रशियात आता लसीच्या मुद्द्यावर शीतयुद्ध सुरु झाल्याचे दिसत आहे. महासत्तेच्या काळापासूनच दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. आता लसींच्या मुद्द्यावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जर्मनी आणि फ्रान्समधील सोशल मीडियावरील सुप्रसिद्ध व्यक्ती आणि यू ट्यूबर्सना अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीच्या बदनामीसाठी आमिष दाखवल्याचा आरोप होत आहे. हे सर्व रशियाचे कारस्थान असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.
जुन्या महासत्तांचं नवं ‘वॅक्सिन वॉर’!
गेल्या शतकात अमेरिका आणि रशिया यांच्यात शीतयुद्ध चालत असे. नंतर सोव्हिएट रशिया महासत्ता म्हणून उरला नाही. रशिया हा देश तेवढा महत्वाचा मानला जात नव्हता. मात्र रशियाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली नव्याने आणि मजबुतीने उभे राहिलेल्या रशियाने पुन्हा अमेरिकेसमोर आव्हान उभं करणं सुरु केलं. कोरोनावरील पहिली लसही रशियानेच शोधली. अंतराळात पहिली भरारी घेणाऱ्या स्पुतनिक उपग्रहाचेच नाव पहिल्या लसीला देत रशियाने एक प्रकारे अमेरिकेला खिजवलेच. अमेरिका आपल्या देशाबाहेर लस पुरवत नसताना रशिया मात्र भारतासह अनेक देशांना लस पुरवत आहे. त्यामुळे अखेर अमेरिकेलाही धोरण बदलावे लागत आहे. एकप्रकारे दोन महासत्तांमध्ये कोरोना लसींवलर वॅक्सिन युद्ध पेटण्याची शक्यता आहे.
फायझरच्या बदनामीसाठी लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
त्यात भर पडली आहे ती नुकत्याच उघड झालेल्या एका प्रकरणाची. जर्मनी आणि फ्रान्समध्ये सोशल मीडिया इन्फ्ल्यूयर्सना अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीची बदनामी करण्याकरिता ब्रिटनच्या एका जनसंपर्क कंपनीने पैशांची ऑफर दिली होती. जर्मनीतील यू ट्युबर मिर्को ड्रॉट्समन यांचे यू ट्युबर तब्बल दीडशे कोटी सब्सक्रायबर आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ब्रिटिश पीआर एजन्सीने पैशाच्या मोबदल्यात फाइजर लसीमुळे जीवघेणे दुष्परिणाम होत असल्याच्या “माहिती अभियान”चा भाग व्हायचे आहे का, असे विचारले. परंतु जेव्हा त्यांनी एजन्सीबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे संबंध हे रशियाशी असल्याचे समजले. कंपनीच्या सीईओंच्या घराचा पत्ता हा रशियाची राजधानी मॉस्कोचा असल्याचे कळले.
रशिया कनेक्शन उघड झाल्यानंतर अकाऊंट प्रायव्हेट केल्याचा दावा
• तक्रारीनंतर कंपनीच्या लिंक्डइन प्रोफाइलमधून कंपनीत काम करणारे सर्व लोक यापूर्वी रशियामध्ये काम करत असल्याचे समोर आले.
• यानंतर, इन्स्टाग्राम अकाउंट हे प्रायव्हेट केले गेले आणि फेसबुक पेजवरील सर्व माहिती हटविली गेली.
• कोरोना लस वापरण्यास मंजूर झाल्यापासून फायझरविरूद्ध चुकीची माहिती पसरविण्याची मोहीम राबविली जात आहे, असा आरोप होत आहे.
• पाश्चात्य देशांकडून आरोप केला जात आहे की, रशिया आपली कोरोना लस स्पुटनिकच्या फायद्यासाठी फायझरला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.