तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
टॉमेटोचे भाव पडू लागल्याने शेतकऱ्यांवर नवं संकट ओढवलं आहे. मेहनतीनं पिकवलेला टॉमेटो बाजारात नेल्यानंतर कवडीमोलानंही विकला जात नसल्यानं शेतकऱ्यांना तो तेथे नेणेही परवडत नाही. त्यामुळे तो संतापानं रस्त्यावर फेकण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला आहे. महाराष्ट्रभरातून टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांच्या मनाला हेलावणाऱ्या कहाण्या ऐकायला येत असताना सत्ताधारी आणि विरोधकांचे मात्र अजूनही भावनिक मुद्द्यांच्या राजकारणात अडकून पडले आहेत. किंवा जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून एकमेकांची असंसदीय भाषेत उणीदुणी काढण्याची राडेबाजी जाणीवपूर्वकच करत आहेत का, असा प्रश्नही सतावतोय.
किसान सभेच्या कॉ. अजित नवलेंसारखे शेतकरी नेते सरकारला आक्रमक इशारे देत आहेत. पण सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत आहे का? मतांसाठी बांधापर्यंत जाणारे राजकारणी सत्ता मिळाल्यानंतर साधे धन्यवाद देण्यासाठीही तेथे परतत नाहीत. मग होतात ते दिखावू दौरे. त्यात आता तर भलतेच राजकाऱण तापलेले आहे. त्यातून बाहेर येऊन सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना कायमस्वरुपी दिलासा देण्यासाठी पावलं उचलणे गरजेचे आहे. त्यासाठीच मुक्तपीठचा हा सरळस्पष्ट प्रयत्न.
टोमॅटोशिवाय घरातील स्वयंपाकाला मजाच येत नाही. गृहिणीला विचाराल तर ती सांगेल टॉमेटोशिवाय अनेक डिशची चव बिघडते, पण या टोमॅटोच्या भावाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनाची चवच घालवली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटो ज्या किंमतीत खरेदी केले जात आहेत त्यातून वाहतूक खर्चही निघत नाही. मेहनतीचाच कचरा होत असल्याने शेतकऱ्यांना रागण येणे स्वाभावितच. त्यांचा राग आता रस्त्यावर दिसत आहे.
शेतकऱ्यांचा वाढता संताप
- शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या माळा घालून रस्त्यावर बसून निषेध केला.
- टोमॅटोला अवघा दोन – तीन रुपये भाव मिळाल्याने काल नाशिक आणि येवला इथं शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला.
- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो विकण्यासाठी आणलेल्या टोमॅटोचा भाव पडल्याने माल परत नेणं शक्य नसल्यानं शेतकऱ्यांनी तो रस्त्यातच फेकून दिला.
- औरंगाबाद-मुंबई महामार्गावर शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन झाले.
टॉमेटो का फेकावे लागतात?
- शेतकऱ्यांना मेहनतीनं पिकवलेला शेतीमाल फेकावा लागतो.
- घाम गाळून, रात्रीचा दिवस करून त्यांनी पिकवलेला शेतीमाल फेकण्यामागे सर्वात महत्वाचं कारण असतं त्याच्या योग्य साठवणुकीची व्यवस्था नसल्याने तो साठवता न येणे.
- त्यामुळे बाजारात मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशा परिस्थितीत भाव कोसळले की शेतकरी नाशवंत शेतीमालासाठी जास्त वाट पाहू शकत नाही.
- नाशवंत शेतीमाल ठेवण्यासाठी योग्य सोयी आपल्याकडे पुरेशा नाहीत.
- त्याला कमी भाव येत असला तरी शेतकरी तो विकतो, एकाने विकला की भाव आणखी खाली येतो, त्यानंतर मग भाव गडगडण्याचे कुचक्रच सुरु होते.
नाशवंत शेतीमालासाठी पुरेशा साठवणूक आणि प्रक्रिया उद्योगांची गरज
- शेतकऱ्याकडे जर कमी भाव असताना नाशवंत शेतीमाल ठेवायची व्यवस्था असेल तर तो माल सुरक्षित ठेवू शकतो.
- जेव्हा भाव वर येतील तेव्हा विकून तो नुकसान टाळत नफाही कमवू शकतो.
- पण आपल्याकडे तशी पुरेशी आणि योग्य साठवणूक व्यवस्थाच नाही.
- गल्ली ते दिल्ली सर्वच राजकारणी सत्ताधारी शेतीमाल साठवणूक, प्रक्रियेची व्यवस्था उभारण्याच्या बाता मारतात. प्रत्यक्षात तशी पुरेशी व्यवस्था फक्त कागदावरच असते.
- शेतकऱ्याला नाशवंत शेतीमालाच्या नुकसानीतून वाचवायचं असेल आणि सन्मानानं शेती करु द्यायची असेल तर त्याला योग्य ती व्यावसायिक पायाभूत सुविधांचं पाठबळ मिळवून दिलंच पाहिजे.
- तसंच अन्न प्रक्रिया लघू उद्योगांचे जाळे विनण्याचीही गरज आहे.
- कच्च्या शेतीमालापेक्षा प्रक्रिया केलेला माल हा शेकडोपट महाग विकला जातो. टिकतोही. त्यामुळे तशा लघू उद्योगांचे जाळे आवश्यक आहे.
शेतीमालाची महागाई यात्रा
टॉमेटोसारख्या शेतीमालाच्या बाबतीतच नाही तर इतरही अनेक शेती उत्पादनांच्या बाबतीत नेहमीच एक अनुभव येतो. शेतकरी शेतीमालाला भाव नाही म्हणून फेकून देताना दिसतात. तर दुसरीकडे शहरी ग्राहक मात्र तोच माल महागड्या दराने घेताना दिसतात. म्हणजे शहरी ग्राहक आणि ग्रामीण शेतकरी दोन्ही सामान्य वर्गांचे शोषणच होते. आताही शेतकऱ्याला वाहतूक खर्चही परवडणार नाही, अशा दराने विकत घेतला जाणारा टॉमेटो मुंबईत मात्र किमान वीस रुपये किलो विकला जातो. त्याचे कारण मधील अडते दलाल हे तर आहेतच पण सर्वात जास्त कमवतो तो रस्त्यावर सामान्य वाटणारा परप्रांतीय विक्रेता. शेतकऱ्यांना थेट विक्रीसाठी शहरांमध्ये मोक्याच्या गर्दीच्या ठिकाणी विक्री केंद्राच्या गाळ्यांची व्यवस्था केली गेली तर शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही शोषण काही प्रमाणात थांबू शकेल.
पाहा व्हिडीओ: