मुक्तपीठ टीम
तारखांवर तारखा…तारखांवर तारखा…आपल्या न्यायालयांबदद्ल नेहमीच असं सांगितलं जातं. न्यायाधीशांची अपुरी संख्या, रोजच वाढते खटले यामुळे न्यायव्यवस्थेवरील दबाव वाढताच असतो. त्यातून मग बलात्कारासारख्या अमानुष गुन्ह्यांसाठी जलदगती न्यायालयांची म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टांची संकल्पना उदयास आली. पण आता या जलदगतींवरील भारही एवढा वाढता आहे की अनेकदा त्यांच्याकडूनही जलद न्याय मिळत नाही, अशा तक्रारी येतात. अशा परिस्थितीत बिहारमधील एका न्यायालयाने एकाच दिवसात साक्ष, वाद-विवाद आणि निकाल सुनावला आहे. पॉक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने ही कामगिरी केली आहे. यामुळे देशासमोर एक नवा आदर्श त्यांनी ठेवला आहे.
अररियाच्या न्यायालयाने एका दिवसात दिला निकाल
- बिहारमधील अररिया जिल्हा न्यायालयाने एका दिवसात निकाल देऊन संपूर्ण देशासमोर एक आदर्श ठेवला आहे.
- पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने त्याच दिवशी साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
- न्यायालयाच्या या निकालाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
- पॉक्सो कायद्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
- यावर्षी २३ जुलै रोजी अररियातील नरपतगंज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- या प्रकरणाच्या तपास अधिकारी रीता कुमारी यांनी आरोपीला अटक करून १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
- या प्रकरणी न्यायाधीश शशिकांत राय यांच्या न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी दखल घेतली आणि २४ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित केले.
- त्यानंतर पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश शशिकांत राय यांनी त्याच तारखेला एकूण १० साक्षीदारांची साक्ष ऐकून घेतली आणि त्याच दिवशी आरोपी दिलीप यादव याला दोषी ठरवून जन्मठेप आणि ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली.
- दरम्यान, न्यायालयाने सरकारला पीडितेला सात लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती शशिकांत राय यांची कामगिरी
- नुकताच न्यायाधीश शशिकांत राय यांनी १० वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर झालेल्या हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला.
- या निकालात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
- याआधी ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दुसऱ्या एका प्रकरणात शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली होती.
- दोन्ही ऐतिहासिक निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-६ कम पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी सुनावले आहेत.