मुक्तपीठ टिम
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राकेश कुमार जैन यांच्याकडे तपासावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविली आहे. यासोबतच न्यायालयाने एसआयटीची पुनर्रचना करण्याचे आदेशही दिले आहेत. या टीममध्ये तीन वरिष्ठ आयपीएएस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. यामध्ये पद्मजा चौहान, दीपेंद्र सिंह, एसबी सिरोडकर यांच्या नावांचा समावेश आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालय करणार आहे.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालय तपासावर देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करू शकते. सर्वोच्च न्यायालय योग्य वाटेल त्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊ शकते. त्याप्रमाणे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती राकेश कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याच वेळी, लखीमपूर हिंसाचाराच्या तपासात गुंतलेल्या उत्तरप्रदेश पोलिसांच्या एसआयटीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारपर्यंत उत्तर प्रदेशच्या आयपीएस अधिकाऱ्यांची यादी सादर करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आयपीएस हा उत्तरप्रदेश कॅडरचा असावा. यापूर्वी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. हिंसाचारात सहभागी असलेल्या एका विशिष्ट आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे (केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा याचा उल्लेख न करता) सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही एफआयआरची स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.
समजून घ्या लखिमपूर शेतकरी हत्याकांड आहे तरी काय?
- संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत होते.
- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते.
- केंद्रीय गृहराज्यमंत्री तेनी यांचा मुलगा आशिष मिश्र तेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले.