सुमेधा उपाध्ये
जगात असंख्य प्रकारचे जीव जन्माला येतात आणि त्यातील एक म्हणजे मानव प्राणी. सर्व जीव आपापली कार्य करतात आणि एक दिवस या जगाचा निरोप घेतात. असे म्हणतात की चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरल्यानंतर मानव जन्म मिळतो. संत तुकाराम महाराजही म्हणून गेलेत अत्यंत दुर्मिळ असा मानव जन्म आहे. जो एकदाच मिळतो. आता हे विविध योनींमधील भ्रमण क्रमाक्रमाने घडते की त्या त्या जन्मातील आपल्या कर्मानुसार हा क्रम आखला जातो हे त्या ईश्वरासच ठावूक. पण इतर जीवांकडे एक नजर टाकली तर त्या सर्वांपेक्षा खूप काही अधिक असं ईश्वराने मानवास दिले आहे. अर्थात मानव हे त्याचे अपडेटेड वर्जन असावे! मात्र याची जाणीव होणे आणि त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आवश्यकता किती जणांना भासते हा खरा प्रश्न अलिकडे उपस्थित होतो.
आपण आपले कार्य सोडून कित्तेकदा दुसऱ्याच्या कार्यप्रणालीकडे अधिक लक्ष देत असतो. त्याचे बारकाईने निरीक्षण करून अधिकतर वेळ त्यांच्यातील चूका शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र, याचवेळी आपला जन्म कशासाठी झाला आहे आणि आपल्या उद्देश पूर्तीसाठी आपण स्वत:मध्ये काही बदल करतो का हा खरा प्रश्न आहे. अलीकडे समाजातील अनेक जण दुसऱ्याच्या कर्तव्याप्रती जेवढे तत्पर असतात तेवढे स्वत:च्या प्रती दिसत नाहीत. जो तो दुसऱ्यातील दोष हेरण्याचा आणि त्यास कमीपणा देण्याच्या मागे लागलेला आहे. दुसऱ्यांची निंदा करणे योग्य नाही, आपल्या विकासाचा मार्ग आपण प्रशस्त करावा हे अध्यात्मातील सार सोशल मीडियाच्या विविध मार्गाने फॉर्वर्ड करीत राहतो मात्र त्यातील काही अंश तरी स्वत:साठी राखून ठेवावा हा विचारही मनास स्पर्श करीत नाही. जे उत्तम करायचे, ज्याचा त्याग करायचाय तो सर्व इतरांनी आपण फक्त लाभ घेण्यासाठी पुढे यावे हा विचारच तसा हीन आहे. एक आदर्श समाज व्हावा, देशाची प्रगती व्हावी, विकास व्हावा मात्र त्यासाठी आम्ही कोणताही ना त्याग करणार ना त्यासाठी काही करण्यास तत्परता दाखवणार, अशी मानसिकता वाढू लागते तेव्हा समाजाचे अध:पतन निश्चित सुरू होते. म्हणजेच त्या समाजाचा आपण भाग असल्याने आपलीही प्रगती खुंटते. सतत आपण आपल्या डोक्यातील नकारात्मकता म्हणजेच कचरा हा राग द्वेष घृणा मत्सर यातून दुसऱ्यावर फेकत असतो. असे महानुभाव नित्य दैनंदिन जीवनात अनेक भेटतात मग त्यांना उत्तरं देण्यात वेळ घालवायचा कि काही सकारात्मक कार्य करायचे हा विचार प्रत्येकाने करून तशी कृती करण्याची वेळ आली आहे. दुसरा काही उत्तम करीत नाही म्हणण्यापेक्षा आपण स्वत: सुरूवात केली तर…
दुसऱ्याने फेकलेला कचरा तेवढ्याच त्वेषाने पुन्हा त्याच्याकडे फेकण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो आपल्या अंगावर आलाय हेच विसरून गेलो तर…! आपल्याला तो चिकटणार नाही. अनेकांच्या अशा निर्लेप वागण्यातून हळू हळू समाजात अनेक समूह असे निर्माण होतील. आपण आपल्या उत्तम वर्तणुकीतून म्हणजेच समस्त मानवाच्या कल्याणासाठी जे जे उत्तम आहे ते करण्यासाठी प्रयत्नशील राहिलो तर हा समाज दूषित झालाय तो शुद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि स्व अनुभवातून प्रत्येकाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होत जाईल. अनेकदा एक प्रश्न विचारला जातो की नितीमुल्यांच्या शिकवण्याची गरज काय आहे? उत्तर असं की जेवढी गरज आपल्या शरीराला अन्नाची आहे, उत्तम भोजनासाठी प्रयत्न करतो कारण शरीर उत्तम रहावे असे वाटत असते. अगदी तशीच किंबहुना श्वासाप्रमाणेच नितीमुल्यांच्या शिक्षणाची गरज आहे. अहो, ती गरज ओळखूनच तर जिजाऊने शिवबाला घडवले, पौराणिक ऐतिहासीक घटनांचे बाळकडू पाजले म्हणून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आपल्या कित्तेक आयाबहिणींना सन्मान मिळाला. राज्यांच्या स्वराज्यात स्त्रित्वाचा गौरव झालाय. जे जे उत्तम आहे ते वेचत रहावे आणि स्वत:सह आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आदर्श निर्माण करण्याची गरज आहेच. हे सर्व शक्य होते ते केवळ प्रत्येकाने स्वत:च्या आचरणात केलेले बदल यातूनच. एक एक व्यक्ती यासाठी स्वत:प्रयत्नशील राहतो तेव्हा समाजातील अन्यही त्याचे अनुकरण करू लागतात. मुळात मानव प्राणी हा अनुकरणानेच उत्क्रांत होत गेलेला आहे. मग जे अनुकरण करायचे ते टरफले टाकून उत्तम दाण्यांचेच करावे म्हणजे सशक्तिकरणाची दालने उघडतील आणि आपले भाग्य आपल्याच हाती या न्यायाने सर्वांचाच जीवन पथ प्रशस्त होत जाईल.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)