मुक्तपीठ टीम
नवीन कृषी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या दरम्यान, दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर चेतावणीचे फलक झळवून शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. पोलिसांनी लावलेल्या फलकात हिंदी आणि पंजाबी भाषेत एक मजकूर लिहिलेला आहे. त्यात म्हटले की, “वैधानिक इशारा, आपल्या सर्वांना येथे जमणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला इशारा दिला जात आहे, अन्यथा आपल्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.”
शेतकरी संघटनांनी राष्ट्रीय राजधानीतील टिकरी सीमेवरील आंदोलनस्थळी दिल्ली पोलिसांनी लावलेल्या या चेतावणी फलकावर आक्षेप घेतला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी असा दावा केला आहे की, हे फलक नवीन नाहीत, आणि त्यात आंदोलकांना केवळ राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करू देणार नाही असे सूचित केले आहे. तसेच “हे फलक २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारानंतर लावण्यात आले आहेत”, असे अतिरिक्त डीसीपी (बाह्य) सुधांशु धामा यांनी सांगितले.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी केले आहे त्यात म्हटले आहे की, “पोलिसांच्या या कारवाईचा आम्ही विरोध करतो. कारण आंदोलनकर्ते त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा वापर करत असल्याने पोलिसांच्या या निर्णयाला विरोध करतो आणि शेतकर्यांना शांततेन आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले”. तसेच “धमक्या आणि इशारे देऊन आंदोलन संपविण्याच्या षडयंत्राचा आम्ही विरोध करते”, असेही म्हटले आहे.