मुक्तपीठ टीम
दलित पँथरतर्फे दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांना प्रदान करण्यात आला. आंबेडकर संघर्ष समितीच्या माध्यमातून शशिकांत कांबळे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन कांबळे यांना सन्मानित करण्यात आले. प्रसंगी दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडघम, अभिनेते सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शशिकांत कांबळे यांचा नेहमी पुढाकार असतो, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराने आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली असून, यापुढे जबाबदारीही वाढली असल्याचे कांबळे यांनी नमूद केले.