डॉ. गिरीश जाखोटिया / व्हाअभिव्यक्त!
नमस्कार मित्रांनो! आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती. फक्त ४८ वर्षांच्या आयुष्यात शाहू महाराजांनी अनेक सामाजिक बदलांचे मोठे चमत्कार केले. शिवरायांच्या नंतर इतके मोठे सामाजिक स्थित्यंतर प्रत्यक्षात आणणारे व त्यांस स्थायी संस्थात्मक स्वरूप देणारे शाहू महाराज हे महाराष्ट्राचे युगपुरुषच! सामाजिक सुधारणांना विवेक व विज्ञानाचा आधार दिल्याने ते महाराष्ट्रीय समाजाला वैचारिक जाणिवांच्या उच्चतम पातळीवर घेऊन जाऊ शकले. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण उपलब्ध करून देणे, शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती देणे व त्यांच्या एकूणच उत्थानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सक्रीय सहकार्य देणे, या तीन बाबी महाराजांच्या अद्वितीय प्रज्ञेची व सामाजिक कर्मयोगाची प्रचिती देतात.
अध्यात्मिक क्षेत्रातील एका समाजाची पारंपारिक मक्तेदारी मोडण्याचे एखाद्या प्रशासकाचे कार्यिक बंड छत्रपतींच्या चळवळीतून दुसऱ्यांदा दिसते. पहिल्यांदा ते दिसले संत बसवण्णांच्या कार्यातून १२ व्या शतकात. महात्मा फुले हे शाहू महाराजांचे शैक्षणिक क्षेत्रातील वैचारिक स्फूर्तीस्थान होते. महाराजांनी यास्तव सत्यशोधक समाजालाही आधार दिला. त्या काळातील वैदिकांनी सामान्यजनांसाठी वैदिक पद्धतीने धार्मिक विधी करण्यास नकार दिल्याने शाहू महाराजांनी ‘क्षत्रीय गुरु’ नेमला व जनतेसाठी वैदिक शिक्षणाच्या शाळाही सुरू केल्या.
महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व अन्य सुधारणांची नुसती यादी करण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपण स्तंभित होतो. याच कारणास्तव केंब्रिज विद्यापीठाने त्यांना ‘एल एल डी’ ही सन्माननीय पदवी बहाल केली होती. महाराजांनी महिला सबलीकरणासाठी मुलींच्या शाळा चालू केल्या, विधवा – विवाहास कायदेशीर मंजुरी दिली, बालविवाह बंद केले आणि देवदासी प्रथासुद्धा बंद केली. आंतर्जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले. जन्माने मिळणारे प्रशासकीय अधिकार महाराजांनी नष्ट करून ते लायकीने कर्माधिष्ठित केले. रणांगणावरील युद्ध जिंकण्यापेक्षाही समाजातील ढोंगी पुरूषसत्ताक प्रथांना नष्ट करण्याचे कार्य अधिक खडतर होय. याचं कारण असं की हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या अन्यायी प्रथा “देवाची मर्जी” म्हणून निमूटपणे पाळणाऱ्या अंधश्रद्ध समाजास विवेकाच्या वाटेवर आणणे खूप कठीण ! आम्ही आज २१व्या शतकातही पहातो की सुधारलेल्या समाजातील सुशिक्षित स्रियासुद्धा ‘महिलाविरोधी’ प्रथांचा खुलेपणाने विरोध करत नाहीत. कल्पना करा, सव्वाशे वर्षांपूर्वीची सामाजिक स्थिती काय असेल!
आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांकरीता आरक्षणाचा, फी – माफीचा विचार आम्ही आज हिरीरीने करतो. हा विचार महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी केला होता. विद्यार्थ्यांना रोजगार, दुर्बळ घटकांसाठी ५०% आरक्षण आणि सर्वांसाठी सक्तीचे प्राथमिक शिक्षण या क्रांतिकारी योजना त्यांनी राबविल्या. कोल्हापूर परिसरातील शिक्षितांची टक्केवारी त्या काळात खूपच कमी होती. महाराजांनी या बाबीकडे प्राधान्याने लक्ष देत शिक्षणासाठी प्रचंड काम केले. विविध समाजांसाठी त्यांनी वसतीगृहे चालू केली. ‘पाटील’ पदावरील प्रशासकीय कामाचा भार लक्षात घेऊन त्यांनी ‘पाटील प्रशासकांची जबाबदारी’ संबंधित विशेष शाळा उघडल्या. कोल्हापूरचं प्रसिद्ध राजाराम कॉलेज महाराजांनीच स्थापलं. त्यांनी कला, संगीत, साहित्य व संशोधनास भरपूर उत्तेजन दिलं. महाराजांना कुस्ती खूप आवडत असे. यास्तव त्यांनी तरुणांसाठी बऱ्याच व्यायामशाळा उघडल्या.
सहकारी किंवा सामुदायिक शेतीबद्दल हल्ली बरीच चर्चा घडताना दिसते.(प्रत्यक्षात फारसं काही होत नाही.) शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या सहकारी सोसायट्या सुरु केल्या. शेतकी अवजारांसाठी कर्ज सहज मिळेल हे पाहिले. शेतीतील उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांची कृषि शिक्षण संस्था चालू केली. शेतीसाठी व शहरासाठी व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा म्हणून राधानगरी धरण उभं केलं. आजही कोल्हापूर शहराला या धरणाचा मोठा आधार आहे. कापड उद्योगाला उभारी यावी व तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कापड गिरणी चालू केली.
आज राजर्षी शाहू महाराजांची आठवण उत्कटतेनं येण्याचं आणखी एक मोठं कारण आहे. यशवंतराव घाटगे नावाच्या कर्तृत्ववान मुलास भोसले राजघराण्यातील महाराणी आनंदीबाईंनी दत्तक घेतले होते. हे यशवंतराव स्वतःच्या असामान्य कर्तृत्वाने “राजर्षी शाहू महाराज ” म्हणून प्रत्येक सामान्य नागरिकाच्या ह्रदयी स्थानापन्न झाले. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा संपूर्ण वैचारिक वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे कार्यान्वित केला, हे आम्हा सर्व महाराष्ट्रीयांचे अहोभाग्य !
आज महाराष्ट्र भारत देशाचे जे वैचारिक, सांस्कृतिक व शैक्षणिक नेतृत्व करतो आहे ते या विशाल परंपरेचं फलित आहे.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीनंतर म्हणजे आजपर्यंतच्या शंभर वर्षांत आमची ‘महाराष्ट्रीय’ वाटचाल कशी चालली आहे? हा महाराष्ट्र साऱ्या देशाला ऊर्जा पुरविणारा एक मोठा स्रोत आहे पण देशाचं फारसं लक्ष अडचणीत आलेल्या या महान राज्याकडे नाही. आजपर्यंत एकही मराठी माणूस देशाचा प्रधानमंत्री होऊ शकलेला नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा खरा वारसा इथे नीटपणे चालविलेला दिसत नाही. येथील भूमीपुत्रांना उत्तम शिक्षण परवडत नाही. सहकारी वा सामुदायिक शेतीसाठी जातपात सोडून शेतकरी एकत्र येत नाहीत. “आपण सत्ताधारी मराठे आहोत” या भावनिक समाधानापलिकडे मराठ्यांची चौफेर प्रगती झालेली नाही. कधी नव्हे तो आज सामान्य मराठा तरुण असहाय्य व गोंधळलेला दिसतोय. राजकारणी मंडळींमध्येच दुफळी असल्याने महाराजांसारखं उत्तम नेतृत्व उभं रहात नाही. या दुफळीमुळेच दिल्लीत मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी जोरदार आग्रह धरु शकत नाही. गेल्या दोन दशकात एका बाजूला औद्योगिक प्रगती होत असताना दुसऱ्या बाजूला बेरोजगार प्रचंड वाढला. सगळी गुणवत्ता असूनही आज महाराष्ट्र हा “महाराष्ट्र” वाटत नाही. शाहू महाराजांच्या जयंतीस आम्ही आत्मपरीक्षणाचा सामूहिक विचार करू शकतो का?
(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात.)
ई-मेल – girishjakhotiya@gmail.com
Copyright ©jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.