मुक्तपीठ टीम
मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी शाखेच्या पथकाने सोमवारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा व्यापारी रियाझ भाटी याला खंडणीशी संबंधित एका प्रकरणात अटक केली. आरोपीला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भाटीचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे सांगण्यात येत असून वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात तो हवा होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
- रियाझ भाटी आणि मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांनी वर्सोव्यातील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
- हे दोघेही दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचे जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
- भाटी आणि सलीम फ्रूट यांनी व्यापाऱ्याकडून ३० लाख रुपयांची कार आणि ७.५ लाख रुपयांची रोकड घेतली.
- इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकील आणि शकीलचा जवळचा सलीम फ्रूट यांचीही एफआयआरमध्ये नावे असल्याचे त्यांनी सांगितले.
- मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने (AEC) अंधेरी पश्चिम येथून आरोपीला अटक केली आहे.
- एईसी कार्यालयात चौकशी केल्यानंतर भाटीला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
भाटी याला यापूर्वी खंडणी, जमीन हडप, गोळीबार अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याने २०१५ आणि २०२० मध्ये बनावट पासपोर्ट वापरून देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. सलीम फ्रूट याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) डी कंपनी सिंडिकेटविरुद्धच्या प्रकरणात अटक केली होती. सलीम फ्रूट न्यायालयीन कोठडीत आहे.