मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशच्या कानपुरात धक्कादायक प्रकार घडला आहे. कानपुरात एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. या वादात दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. सामान्य माणसं आणि पोलीसही जखमी झाले. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले. त्यांना हिंदू समाजातील एका गटानं प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे काही किमी अंतरावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी एका समारंभात असताना हे सारं घडलं. या हिंसाचाराचं मूळ भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या बेताल वक्तव्यात दडलं आहे. त्याचा फायदा घेत मुस्लीम समाजातील एका गटानं शस्त्र, दगड वापरत उन्माद दाखवला. त्याचवेळी पोलिसांनी योग्य नियोजन वेळेत न केल्यामुळे त्या दंगलखोरांचं फावलं.
वरिष्ठांकडून योग्य नियोजन नसल्यामुळे घटनास्थळी कमी पोलीस होते. तरीही त्या पोलिसांनी या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केला. त्यामुळं कानपुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. तरीही पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या दंगलीत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. १८ जणांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
- भाजपा प्रवक्ते नूपुर शर्मा यांनी अल्पसंख्याक समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
- त्यामुळं काल मुस्लिम समुदायाच्या एका गटाने नमाज झाल्यानंतर दुकान बंद करण्याची घोषणा केली होती.
- त्यामुळं आज या गटाने दुकाने बंद करायला सुरुवात केली, परंतु दुसऱ्या धर्माच्या एका गटाने दुकाने बंद करायला विरोध केला.
- त्यामुळं हा वाद उफाळून आला.
दोन गटात तुफान दगडफेक!
- कानपूरच्या परेड चौकावर शुक्रवारच्या नमाज झाल्यानंतर बाजार बंद करण्यासाठी निघालेल्या मुस्लिम समाजाच्या एका गटाने दगडफेक केली आहे.
- त्यावेळी हिंदू समाजाच्या दुसऱ्या गटाने त्यांच्यावर दगडफेक केली.
- या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत.
- तर पोलिसांनी या दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न केला.
- परंतु त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली आहे.
- त्यामुळं कानपुरात तणावाचं वातवरण निर्माण झालं.
- या तणावादरम्यान पोलिसांनी दोन्ही गटाच्या लोकांवर लाठीमार केला.
- तर हिंसक जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही केला.
- सध्या घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
राष्ट्रपती-पंतप्रधान असतानाही पोलिसांचा निष्काळजीपणा!
- दंगलीच्या वेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद येथून ५० किमी अंतरावर असलेल्या कानपूर ग्रामीण भागातील पारौंख गावात उपस्थित होते.
- त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.
- या व्हीव्हीआयपी संचलनामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
- बाजार बंद पुकारला गेला तेव्हा तेथे एका एसीपीसह आठ ते दहा पोलीसच रस्त्यावर हजर होते.
- पण जमाव हजारोंच्या संख्येत गेला.
- गदारोळ सुरू झाल्यावर या पोलिसांनी हल्लेखोरांवर लाठीमार केला.
- तेथून हल्लेखोर पळून गेले आणि काही मिनिटांतच हजारो लोकांसह पुन्हा आले आणि गोंधळ वाढला.
- गर्दी जमली असताना पोलीस दलाला का पाचारण करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.