रेल्वेच्या चीफ बुकींग सुपरवायझर कैलास कदम यांनी गुरुवारी सकाळी विद्याविहार रेल्वे स्थानकातील आपल्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यांच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.
५५ वर्षांचे कैलास कदम हे मध्य रेल्वेमध्ये चीफ बुकींग सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक विद्याविहार रेल्वे स्थानकात होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले. चहा घेतल्यानंतर ते केबीनमध्ये काम करीत होते, अचानक त्यांनी आतून कडी लावली, त्यानंतर त्यांनी तिथेच गळफास लावून आत्महत्या केली होती, बराच वेळ होऊन कैलास कदम हे केबीनबाहेर आले नाही, त्यामुळे त्यांचा एक सहकारी तिथे गेला होता, यावेळी त्याला कैलास यांनी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकार्यांसह घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती, त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
प्राथमिक तपासात कैलास कदम हे कल्याण येथे पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, मात्र त्यांना कुठले तणाव होते याचा उलघडा होऊ शकला नाही, त्यांच्याकडे सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. त्यांच्या आत्महत्येची माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली होती, लवकरच त्यांच्या पत्नीसह इतर नातेवाईकांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली जाणार आहे. या जबानीनंतर त्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.