प्रफुल्ल वानखेडे / व्हा अभिव्यक्त!
वयाच्या २३व्या वर्षी मी पहिला व्यवसाय सूरू केला होता. अत्यंत वाईट पद्धतीने त्यात अपयश आल्याने पहिले प्रेमाने विकत घेतलेले घर माझ्या नावावर व्हायच्या आतच विकावे लागले होते. कर्जबाजारीपणा अन कफल्लक होणे काय? हे नको त्या वयात फार क्रूरपणे अंगावर आले होते. अत्यंत तणावपुर्ण परिस्थितीत मी रात्री १२-१ च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला आलो होतो. त्यावेळेस मी कांदिवलीत रहायचो. बसने दादरला उतरायच्या ऐवजी चूकून सायनलाच उतरलो,खाली आलो चूक लक्षात आली आणि मग कांदिवलीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षात बसलो आणि एका लेबर कॅान्ट्रॅक्टरचा पैशांच्या तगाद्यासाठी फोन आला. मी फोन उचलला तसा तो तिकडून भयंकर सूरू झाला.
तो अद्वातद्वा बोलत होता,मी त्याला इकडून “आजच घर विकलेय,तूम्हाला आठवड्याभरात पैसे मिळतील म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून,ओरडून सांगत होतो पण तो काही ऐकायला तयार नव्हता. मी बराच वेळ समजावून सांगितल्यावर आणाभाका घेतल्यावर, त्याने कसातरी फोन ठेवला. तो दारू पिऊन होता त्यामुळे त्याची भाषा जास्तच रफ होती.
रिक्षा अंधेरीच्या जवळपास आली होती. माझे डोळे पाण्याने डबडबले होते. घरी हे सर्व सांगू शकत नव्हतो, व्यवसाय सुरू करायचा निर्णय माझा होता… आता तो चुकला. तरी माझाच होता. काही समजत नव्हते. डोकं घट्ट पकडून मी रडत होतो.
एवढ्यात “बेटा – ठिक तो हो?” मी या आवाजाने दचकलो, इकडेतिकडे पाहिले तो आवाज रिक्षावाल्या काकांचा होता. मी हुंदका आवरला आणि “हो” म्हटलं….पण रडू काही आवरेना…काकांनी मग एक टपरी पाहून रिक्षा थांबवली.
माझ्या खांद्यावर हात ठेऊन मला रिक्षातून खाली उतरवले. समोर अंडाबुर्जीची गाडी होती, त्यांनीच ॲार्डर केली, मला एक प्रश्नही विचारला नाही, भरपूर खाऊ घातले. मी पण अधाशासारखं खाल्लं, काही प्रश्न नाही काही ऊत्तर नाही, मी पैसे देऊ करायला गेलो तर बिल त्या रिक्षावाल्या काकांनीच पेड केले. सकाळपासून भूकेलो होतो, या काकांनी फोनवर बोलताना ते ऐकले आणि इकडे गाडी थांबवली होती.
मला ही पोटात चारघास गेल्याने बरे वाटत होते, मी त्या काकांना काही सांगणार इतक्यात तेच म्हणाले “ हमें बहोत आगे जाना है, ऐसे हादसे तो होते रहेंगे, रूकना नही कभी…… चलो बैठो रिक्षा में” मला काही बोलूच दिले नाही, मी ही यांत्रिकपणे पुन्हा रिक्षात बसलो. त्यांच वाक्य मात्र डोक्यात कोरलं गेलं, तणाव थोडासा कमी झाला होता.
कांदिवलीला बिल्डींगच्या खाली मी रिक्षातून उतरलो. रिक्षावाल्याकाकांना मनापासून हात जोडले, किती पैसे झाले विचारले आणि खिशाकडे हात टाकला,तोपर्यंत रिक्षावाल्या काकांचा हात माझ्या डोक्यावर होता. आशिर्वाद देत म्हणाले – “हमे बहोत आगे जाना है……कभी रूकना नही….हिंम्मत रखो….आगे बढो!” बरचं काही ते बोलत होते….माझे डोळे पुन्हा अश्रुंनी डबडबले, तेवढ्यात काकांचा हात खाली आला, रिक्षाच्या स्टार्टरचा दांडा वर उचलला गेला, मी “ओ काका पैसे घ्या,पैसे घ्या” म्हणून आवाज देत होतो पण तोपर्यंत रिक्षा भूरर्कन कुठच्या कुठे निघून गेली होती.
माझ्यावर मोठं कर्ज ठेऊन आयुष्याची एक मोठी शिकवण देऊन तो कर्मयोगी मुंबईतल्या माणूसकीचं रोपटं माझ्या मनात लावून निघून गेला होता. आजही मी तो रिक्षावालाकाका शोधत असतो. तसा तो आपल्या प्रत्येकातच असतो. जीवनात प्रत्येकालाच काहीतरी विलक्षण करण्याची संधी असते पण ती साधतां यायला हवी. अगदी छोटी छोटी कृत्ये हे जग सुंदर बनविण्यासाठी पुरेसे आहेत. माणुसकीचं बीज रूजायला, जगायला, वाढायला पाहिजे.
मुंबईची, महाराष्ट्राची ही संस्कृती टिकायला पाहिजे. या शहराची माणूसकीची बाजू प्रचंड सकारात्मक आहे….गरीब, कष्टकरी, मजूर यांच्या घामाने ती फार सुपीक झाली आहे. मुंबईत शिकण्यासारखे खुप काही आहेच आणि मानवसेवेचेही वेगळेच विश्व आहेत. शेवटी माणुसकी वाढायला हवी, माणूसपण जपायला हवं!
(प्रफुल्ल वानखेडे हे स्वबळावर शून्यातून शिखर गाठणारे उद्योजक. नाविन्यपूर्ण कल्पनांनी सळसळणारे, सतत सक्रिय राहणारे आणि त्यातूनच वाचन प्रचार-प्रसाराचं व्रत घेतलेले वाचनप्रेमी. मराठी माणसांना उद्यमशील बनवण्यासाठी त्यांचे सल्ले मोलाचे असतात. सामाजिक घडामोडींवर संवेदनशीलतेनं ते भाष्य करतात.)
ट्विटर @wankhedeprafull