तुळशीदास भोईटे – सरळस्पष्ट
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे आजचे भाषण वाघिणीच्या आवेशातील होते. त्यात डरकाळ्या तर होत्याच पण भावनांचा ओलावाही. सर्वात महत्वाचं म्हणजे संयम दाखवतानाच शक्ती सूचित करत आक्रमकतेची झलकही दाखवणारे होते. त्यांच्या आजच्या भाषणातील बारा विधाने…बारा डायलॉग हे नेमकं कुणाचे बारा वाजवण्याची इच्छा व्यक्त करणारे होते, हे वेगळे सांगायला नको. अर्थात आज जरी पंकजा मुंडे स्वत:ला पांडव म्हणवत पक्षांतर्गत विरोधकांना कौरव संबोधित असल्या तरी आजच्या महाभारतात इतिहास लिहिला जातो तो जेत्यांनाच पांडव ठरवणारा. त्यात पुन्हा भाजपातील या नव्या पांडवांचा विजय त्यांनी नेमकं कुणाला श्रीकृष्ण मानत सारथ्य सोपवलंय, त्यावरही अलवंबून असणार आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे यांनी संयमातील शक्ती ओळखली आहे. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते, हे कार्यकर्त्यांना बजावलं. तसेच पक्षांतर्गत सत्तास्पर्धेत २०१४पासून सतत वरचढच असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृपाशीर्वाद असतो, हे लक्षात घेत आपले नेते म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला आहे. तसेच अमित शाहांचाही. फडणवीसांच्याबाबतीत काहीसं प्रतिकुल असतं ते शाहांकडून असं भाजपात बोललं जातं. त्यामुळे पंकडा मुंडेंनी ते सर्वोच्च दोघेच त्यांचे नेते असल्याचे सांगतानाच अप्रत्यक्षरीत्या फडणवीसांना अनुल्लेखानं कमी लेखण्याचाही प्रयत्न केला आहे. आपल्या लेखी नेते म्हणून ते नाहीतच असंच त्या सुचवू पाहत आहेत. लोकांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाचा ओझरता उल्लेख करताना त्या “कुणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं आहे, ते चालतं का?” असं म्हणत योग्य वर्मावर योग्य वेळी घाव घालण्याचे राजकारण करु लागल्याचे दाखवून देत आहेत.
महाभारत मांडत कौरव पांडवांची नीतीकथा सांगताना त्यांना स्वत:ला विक्टीम दाखवत देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवायचे होते, हे स्पष्ट आहे. पण तसे करतानाही सध्या महाराष्ट्र भाजपात फडणवीसांचीच चालते. नव्यानं टीम नरेंद्र निवडताना, महाराष्ट्रात विझन देवेंद्रच चाललं हे स्पष्ट आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यासोबत असणारे त्यांच्यासोबत आहेतच असे नाही, याची आपल्याला माहिती आहे, असे दाखवत त्यांच्याशी लाइन ओपन ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न “कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनानं पांडवांच्या सोबत होते. फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते. कळलं का तुम्हाला?” यातून स्पष्ट होतो. तसेच आपल्या समर्थकांनाही आपण एकटे नाही, समोर सध्या असलेले अनेक मनानं आपल्या सोबत आहेत, असा दिलासा देत त्यांंचं मनोधैर्य राखण्याचाही प्रयत्न दिसतो.
“आपलं घर आपण का सोडायचं? हे घर आपण प्रेमानं आणि कष्टानं बनवलंय?” असं बोलताना त्या सध्याच्या संयमाचं कारण देतात, तर पुढे “ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू. जेव्हा मला वाटेल आता इथं राम नाही, तेव्हा बघू! त्याग करायचा तिथं त्याग करू.” असं सांगताना भविष्यातील काही वेगळे निर्णय घ्यावे लागले, तर त्यासाठीची पार्श्वभूमी तयार करून ठेवण्याची हुशारी दाखवतात.
सर्वात महत्वाचं म्हणजे, भाजपाला न परवडणारा एक मुद्दा त्या वाढवताना दिसतात. गोपीनाथ मुंडे यांनी बहुजनवादी राजकारणातून स्वत:चं महत्व वाढवलं. आज त्यांची लेक “मुंडेंसाहेबांनी प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी राजकारणात आणले! राज्यातील प्रत्येक वंचित कार्यकर्ता माझा परिवार! मला तुमचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे!” असं सांगताना कुठेतरी बहुजनवादी राजकारणाचा पत्ता हाती असल्याचं दाखवताना दिसल्या, म्हटलं तर तो इशाराच म्हणावा लागेल!
पंकजा मुंडेंचे बारा डायलॉग!
- कुणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं आहे, ते चालतं का?
- एकदा वाघीण म्हणता, कधी पंख छाटले म्हणता. नेमकं काय?
- माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. जे. पी. नड्डा आहेत.
- योग्य निर्णय घ्यायची वेळही योग्य असते, अविचारानं काही करायचं नसतं.
- मोठा नेता नेहमी त्याग करतो, मुंडे साहेबांनी हेच केलं.
- मूठ आपली शक्ती आहे, हीच शक्ती कमी करण्याचा डाव आपण कधी करु द्यायचा नाही.
- पांडवावर अन्याय झाला होता की नाही? त्यांनी फक्त सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोकाएवढीही जागा देणार नसल्याचं कौरव म्हणाले. पण तरीही पांडवांनी धर्मयुद्ध जिकलं.
- त्यांनीच युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. जो चांगला असतो, तो लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून प्रयत्न करतो. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी उभे आहोत.
- कौरवांच्या सेनेतील अनेक लोक मनानं पांडवांच्या सोबत होते. फक्त शरीरानं कौरवांच्या सोबत होते. कळलं का तुम्हाला?
- माझे संस्कार निर्भय राजकारणाचे आहेत. आपलं घर आपण का सोडायचं? हे घर आपण प्रेमानं आणि कष्टानं बनवलंय? ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू
- जेव्हा मला वाटेल आता इथं राम नाही, तेव्हा बघू! त्याग करायचा तिथं त्याग करू.
- मुंडेंसाहेबांनी प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी राजकारणात आणले! राज्यातील प्रत्येक वंचित कार्यकर्ता माझा परिवार! मला तुमचं सगळं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे!