मुक्तपीठ टीम
कलेच्या माध्यमातून जे होतं ते भल्याभल्यांच्या व्याख्यानांमधूनही होऊ शकत नाही. त्यामुळेच आता कुपोषणातून सुपोषणाकडे जाण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून महाराष्ट्रातही कला पथकांद्वारे पोषण जनजागृती अभियान राबवले जात आहे. विशेष म्हणजे हे अभियान राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आहे.
पुणे, पालघर, गडचिरोली, बीड व नंदुरबार या पाच जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत हे अभियान चालणार आहे. कलापथकांद्वारे लोककलांच्या माध्यमातून पोषण पंधरवडा विशेष जनजागरण होत आहे. या अभियानाद्वारे गरोदर माता व बालक यांसाठी पोषणाचे महत्व, आवश्यकता तसेच पोषण कसे होऊ शकते, त्यासाठी कोणते घरगुती पदार्थ वापरून आपण पोषक आहार तयार करू शकतो, याबद्दल माहिती दिली जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पोषण जनजागृती अभियान
- गडचिरोली जिल्ह्यातही कलापथकाद्वारे पोषण विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
- या अभियानात चंद्रपूरच्या सुभेदार रामजी बहुउद्देशिय संस्थेच्या कलावंताकडून कलापथकाच्या माध्यमातून नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
- चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै इथे आज दिनांक ३१ मार्च रोजी होत आहे .
- १ एप्रिल २०२२ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी इथे , धानोरा तालुक्यातील पेंढरी इथे २ एप्रिलला, ३ एप्रिलला कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी इथे तर ४ एप्रिलला कोरची तालुक्यातील मसेदी येथे समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.
- या कार्यक्रमात गरोदर माता व बालकांसाठी आरोग्य विषयक माहिती लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, वर्धा कार्यालयाने दिली आहे.