मुक्तपीठ टीम
पंडित नेहरू म्हटलं की भाजपाकडून विरोध ठरलेलाच, असं मानलं जातं. अनेकदा भारताच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल भाजपाशी वैचारिक नातं दिसणारे ट्रोलर खूपच वाईट पद्धतीने नेहरुंबद्दल मांडतात. मात्र, याच पंडित नेहरुंमुळे रशिया x युक्रेन युद्धाच्या पेचप्रसंगात नरेंद्र मोदी सरकारला युनोत बचाव झाला, असं शिवसेना नेते, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ बजावलं आहे.
संजय राऊतांनी कशी करून दिली पंडित नेहरूंची आठवण:
- हिंदुस्थानी विद्यार्थी युक्रेनमध्ये हजारो हिंदुस्थानी विद्यार्थी अडकून पडले.
- त्यांना आणण्यासाठी सरकारला चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवावे लागले.
- दोन विद्यार्थी या युद्धात मरण पावले व शेकडो विद्यार्थ्यांना नरकयातना भोगत पायपीट करावी लागली.
- “हिंदुस्थान सामर्थ्यवान असल्यामुळेच आपल्या विद्यार्थ्यांची रशिया – युक्रेन सीमेवरून सुटका होऊ शकली! ” असे प्रचारकी भाषण पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत केले.
- सत्य असे आहे की, हजारो विद्यार्थ्यांना पहिले आठ दिवस वालीच नव्हता.
- उपाशी , चालत शेकडो मैल ही मुले पोलंड, रूमानिया, स्लोव्हाकियाच्या सीमेवर बेवारस अवस्थेत उभी होती.
- त्यांच्या आक्रोशाने येथे संतापाच्या ठिणग्या पडू लागल्या तेव्हा सरकारला हालचाल करावी लागली.
- ‘विदेश मंत्रालय’ या काळात नेमके काय करीत होते? पंडित नेहरूंनी त्यांच्या काळात विदेश मंत्रालय एक ‘स्वतंत्र इन्स्टिटयूशन प्रमाणे विकसित केले.
- आंतरराष्ट्रीय राजकारण, इतिहासाचे भान आणि हिंदुस्थानी गुटनिरपेक्षता म्हणजे स्वतंत्र, अलिप्त भूमिकेची एक महान परंपरा आपल्या विदेश मंत्रालयास लाभली आहे, पण विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी व अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे.
- ज्या नेहरूंच्या अलिप्तवादावर श्री. मोदी टीका करीत राहिले तोच अलिप्तवाद त्यांना रशिया- युक्रेन वादात ‘युनो’मध्ये स्वीकारावा लागला ! नेहरूंच्या धोरणानेच पंतप्रधान मोदींना वाचविले!
बलाढय़ रशियापुढे युक्रेन एकाकी लढतेय…
- रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू आहे.
- त्यामुळे संपूर्ण जग युद्धग्रस्त झाले. रशिया युक्रेनवर ज्या पद्धतीने बॉम्बहल्ले करीत आहे त्याची चित्रे विदारक आहेत.
- युक्रेनची जिवंत राजधानी किवचे रूपांतर जवळ जवळ कब्रस्तानात, बेचिराख स्मशानात झाले.
- माणसांच्या जिवांचे मोल उरले नाही तेथे संपत्तीचे मोल काय राहणार? बलाढय़ रशियापुढे युक्रेन एकाकी लढत आहे.
- युक्रेनला सहानुभूती सगळय़ांची, ती फक्त शब्दांची.
- ज्यो बायडेनही अमेरिकेचे सैन्य युक्रेनमध्ये पाठवायला तयार नाहीत.
- यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक प्रमुख सूत्र लक्षात घेतले पाहिजे, ते म्हणजे कोणत्याही राष्ट्राला चिरस्थायी स्वरूपाचे मित्र नसतात.
- चिरस्थायी असतात ते फक्त त्याचे हितसंबंध.
- युक्रेन- रशिया प्रकरणात तेच घडले आहे.
- रशियाच्या क्षेपणास्त्रांनी एक देश जळत असताना युक्रेनच्या बाजूने नक्की कोण उभे राहिले? युरोपियन राष्ट्रे, नाटो, युनोसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर फक्त रशियाच्या निषेधाचा ठराव मंजूर झाला.
- त्यामुळे युक्रेन नष्ट होण्याचे थांबले काय?
रशियाला बदनाम करणे व एकाकी पाडणे हाच अमेरिकेचा उद्देश!
- स्वातंत्र्याचा झेंडा सोव्हिएत युनियनमधून जे देश बाहेर पडले व ज्यांनी स्वातंत्र्याचा वेगळा झेंडा फडकविला त्यात युक्रेन आहे.
- १२ जून १९९० रोजी ठराव करून आपले सार्वभौमत्व घोषित केले.
- सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडण्याचा आपल्याला हक्क आणि अधिकार आहे, असेही घोषित करणाऱ्या १५ प्रांतांत युक्रेन होता.
- मॉस्कोचे वैचारिक, शासकीय आणि कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व या देशाने झुगारून दिले.
- युक्रेन रशियापासून स्वतंत्र झाला ते रशियाच्या मनास इतके टोचले का? कारण रशियाची १८ हजार अण्वस्त्रे व चेर्नोबील अणुभट्टी युक्रेनमध्ये होती.
- दुसरे असे की, युक्रेन रशियाचे अधिपत्य मानायला तयार नव्हते व त्यांचा कल पहिल्यापासून युरोपियन राष्ट्रांच्या ‘नाटो’ संघटनेचे सदस्य होण्याकडे जास्त होता.
- युक्रेन ‘नाटो’चा सदस्य झाला तर रशियाच्या सीमेवर एक दिवस नाटोचे सैन्य व अमेरिकेचे रणगाडे उभे राहतील व रशियाच्या वर्चस्वाला नवे आव्हान उभे राहील.
- पुतीन हे २२ वर्षे रशियाचे सत्ताधीश आहेत.
- रशियाच्या विघटनानंतरचे ते सत्ताधीश आहेत, पण त्यांचा वावर स्टालिनप्रमाणे सत्ताधीशाचा आहे.
- मॉस्कोच्या लाल चौकातील क्रेमलिनच्या भिंतीआड हा पुतीन नावाचा सत्ताधीश बसतो व जगावर राज्य करण्याचे मनसुबे रचतो.
- त्यासाठी तो सीमेवरील युक्रेन नावाचा एक भव्य देश बेचिराख करून युरोप आणि अमेरिकेला आव्हान देतो.
एखाद्या देशात महागाई, बेरोजगारीसारखे अंतर्गत प्रश्न उफाळून येतात तेव्हा त्या देशाचा राज्यकर्ता, राष्ट्रभक्ती, राष्ट्रवादाचे - भावनिक गुंते निर्माण करतो व परकीय राष्ट्रांपासून धोका असल्याचे अवडंबर माजवून युद्ध करतो.
पुतीन यांनी तेच केले. - हिंदुस्थानात होणारा ‘भारत-पाकिस्तान’ हा खेळ त्यातलाच आहे.
- रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे समर्थन कोणीच करणार नाही, पण अमेरिकेला नऊ हजार किलोमीटर दूर युक्रेनमध्ये इतका रस का? रशियाच्या सीमेवरील युक्रेनला ‘सैन्य आघाडीत’ , ‘नाटो’त सहभागी करून घेण्याची गरज काय ? रशिया युक्रेनचे युद्ध संपावे, असे अमेरिकेला वाटत नाही.
- रशियाला या प्रकरणात बदनाम करणे व एकाकी पाडणे हाच अमेरिकेचा उद्देश आहे!
रशिया युक्रेन युद्ध ही पुतीन यांची खाज…
- नाटोचा मीडिया युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना पश्चिमी राष्ट्रांनी जगाचे हीरो बनविले.
- हातात बंदूक घेऊन लढणाऱ्या व देश सोडणार नाही असे सांगणाऱ्या झेलेन्स्की यांची छायाचित्रे व व्हिडीओ जगभर प्रसारित करण्यात आले.
- कारण रशियाच्या हातात सैन्य असले तरी ‘नाटो’ राष्ट्रांच्या हातात मीडिया आहे.
- रशियाचे रुबल हे चलन.
- त्यास आज अजिबात किंमत नाही.
- पुतीन यांनी त्यांचा देश स्टालिनच्या काळात नेऊन ठेवला.
- स्टालिनच्या काळापासून रशियन लोकांवर एक मोठा परिणाम झाला , तो मुकेपणाचा.
- बोलण्याचे स्वातंत्र्य नसले की लोक दारू पिऊ लागतात . रशियात आज तेच घडत आहे.
- रशिया युक्रेन युद्ध ही पुतीन यांची खाज आहे.
- चर्चेतून मार्ग काढता आला असता, पण पुतीन यांनी सरळ युद्धच पुकारले.
- शेकडो माणसे, सैनिक, लहान मुले मारली गेली.
- लोकांनी कष्टाने उभारलेली घरे, संस्था, उद्योग नष्ट झाले.
- एक संपूर्ण देशच संपला व लोक निर्वासित झाले, पण जागतिक मंचावर प्रत्येकजण राजकीय भूमिका वठवताना दिसत आहे. आर्मेनियाच्या सीमेवर आज निर्वासितांचे सगळ्यात जास्त लोंढे आहेत.
- त्यात हिंदुस्थानी विद्यार्थीसुद्धा आहेत.
एक दिवस युक्रेनही पुन्हा राखेतून झेप घेईल…
- रशियातून आर्मेनिया फुटून निघाला, पण ७ डिसेंबर १९८८ रोजी आर्मेनियात फार मोठा भूकंप झाला.
- ३५ हजार लोक या भूकंपामुळे मृत्यू पावले.
- ८ लाखांवर बेघर झाले.
- गोर्बाचेव्ह तेव्हा युनोत होते.
- तेथून ते परत आले.
- ७५ खेडी, १९ लहान – मोठी शहरे त्यात उद्ध्वस्त झाली, परंतु या भयंकर नैसर्गिक आपत्तीने एक झाले.
- सबंध जग आर्मेनियाच्या मदतीस धावले.
- आर्मेनिया नंतर रशियाचा भाग राहिला नाही.
- तो जगाचा झाला.
- राजकीय तत्त्वज्ञान, धर्म, देशोदेशीचे राजकारण हे सारे त्या आपत्तीने मोडीत काढले.
- उरले ते फ़क्त माणसाचे माणसाशी असलेले नाते आणि म्हणूनच आर्मेनियाच्या जनतेने जगाचे नंतर आभार मानले ते शब्द फार मोलाचे आहेत: – “Thank you people of the earth , we are children of one planet and nature!” आपत्तीतून सुचलेला हा चिरंतन विचार शांततेच्या काळात सर्वांनी लक्षात ठेवला तर या पृथ्वीवरच्या माणसाला सहज सुखाने जगता येईल.
- मग तो कोणत्याही रंगाचा, धर्माचा व देशाचा असो, तो सुखी होऊ शकेल.
- एक दिवस युक्रेनही पुन्हा राखेतून झेप घेईल.
- पुतीन येतील आणि पुतीन जातील!