मुक्तपीठ टीम
आतापर्यंत बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांविरोधातील कारवाईमुळे सातत्यानं चर्चेत राहणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना आता त्यांच्या नातेवाईकांच्या भूतकाळाची आठवण करून देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची मेहुणी ड्रग्स व्यवसायात गुंतली आहे का, असा गंभीर प्रश्न विचारला आहे. त्यावर बोलताना वानखेडे यांनी इंकार केलेला नाही. स्पष्टीकरण देत, क्रांती रेडकरची बहिण हर्षदा रेडकरविरोधातील ड्रग्स गुन्ह्याचे प्रकरण जवळपास १३-१४ वर्षे जुनं असल्याचे सांगितले आहे. तसेच हर्षदा रेडकरविरोधात ड्रग्स प्रकरणात गुन्हा नोंदवला गेला, तेव्हा क्रांती रेडकरशी लग्नही झाले नव्हते असं म्हटलंय.
नवाब मलिक यांचे भुतकाळात डोकावणारे ट्वीट
नवाब मलिक सध्या एखाद्या थरारक वेब सीरीजसारखे रोज नवनवे आरोप करतात. सोमवारी त्यांनी ट्वीट करून नवी खळबळ माजवली. त्यात ट्वीटमध्ये त्यांनी, “समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्सच्या व्यवसायात आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या पुरावा!” असं लिहिले आहे. त्या ट्वीटसोबत मलिक यांनी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची माहिती देणारे स्क्रिन शॉट्स अटॅच केले आहेत.
Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
समीर वानखेडेंकडून इंकार नाही, पण लग्नाआधीचा गुन्हा असल्याचा दावा
- माझी मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकरविरुद्ध जानेवारी २००८ मध्ये पुण्यात केस दाखल करण्यात आली होती.
- तेव्हा मी एनसीबीच्या सेवेत नव्हतो.
- क्रांती रेडकरशी माझा २०१७मध्ये माझे लग्न झाले.
- ड्रग्स प्रकरणातील गुन्ह्यानंतर ९ वर्षांनी आमचे लग्न झाले.
- त्यामुळे माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही.
- ही घटना जुनी असून विनाकारण माझं नाव यात जोडलं जात आहे.