मुक्तपीठ टीम
नागपूर येथील नागनदीच्या पुनर्जीवन प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कॅबिनेटच्या खर्च व वित्त समिती ईएफसीने मंजुरी दिली आहे. याद्वारे प्रकल्पाच्या २ हजार ११७ कोटींच्या कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागनदी पुनर्जीवन प्रकल्पाच्या पूर्णत्वास आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याअंतर्गत ९२ एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० कि.मी. सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन कम्युनिटी टॅायलेट निर्माण केले जाणार आहेत.
नागपूर शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या नागनदीला पुनर्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी योजना मंजूर केली आहे. नागनदीच्या प्रवाह क्षेत्रातील भूजलपातळी वाढवण्यात आल्यास नदी पुनर्जीवित होईल, असा निष्कर्ष नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने केलेल्या संशोधनात काढण्यात आला होता.
नागनदी आधी शुद्ध पाण्याने प्रवाहित होती. झपाट्याने झालेल्या शहरीकरणाचे परिणाम नदीच्या मूळ प्रवाहावर झाला आहे. नागपूर महापालिकेने केंद्र सरकारकडे नागनदी पुनर्जीवित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली होती. केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीने दिलेल्या आजच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाच्या प्रत्यक्षाला सुरूवात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला खर्च वित्त समितीने (ईपीसी) मान्यता दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता २,११७ कोटी रुपयांचे हे काम प्रत्यक्षात सुरू होईल असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेशांमधे सांगितले. या कामासाठी आठ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, या प्रकल्पांतर्गत ९२ एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प, ५०० किमी सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे, पंपिंग स्टेशन आणि सामुदायिक शौचालये बांधण्यात येणार असल्याची माहिती श्री.गडकरी यांनी दिली.