मुक्तपीठ टीम
जंगलातील पशू-पक्षी-साप…सारं काही पुन्हा पाहता येणार. वाकुल्या दाखवणाऱ्या माकडांसोबतच महाकाय हत्तीही दिसणार. आणि हो पेंग्निनलाही भेटता येणार…तेही थे मुंबईतच. कारण आबालवृद्धांची आवडती राणीची बाग सोमवारपासून पुन्हा उघडण्यात येण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यात अनेक पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती. आता मुंबई मधील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयाचा दरवाजा पर्यटकांसाठी उघडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जर परवानगी मिळाली तर येत्या १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांना भायखळा प्राणीसंग्रहालयात प्रवेश मिळू शकतो.
बाग आणि प्राणीसंग्रहालय पुन्हा मुंबईकर आणि पर्यटकांना उघडल्यानंतर त्यांना ‘शक्ती’ आणि करिश्मा या दोन रॉयल बंगाल टायगर्स बघायला मिळतील. त्यांना औरंगाबादच्या प्राणीसंग्रहातून मुंबईत आणण्यात आले आहे. खरंतर, पर्यंटकांना त्यांना २५ मार्च २०२० पासूनच पाहता येणार होतं. पण त्याआधीच लॉकडाऊन सुरु झाला.
प्राणीसंग्रहालय पर्यटकांना खुले करावे यासाठी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त यावर काय निर्णय घेतात यावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.
गर्दी होणार नाही यासाठी नियम व अटी
- उद्यानात पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून जागोजागी ठराविक अंतरावर वर्तुळ आखण्यात आले आहे.
- प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱ्यासमोर आणि तिकीट खिडकीजवळही असे गोल आखलेले आहेत.
- तसेच जागोजागी सॅनिटायझर, कचराकुंडी आदींची सोय करण्यात आली आहे.
- गर्दी वाढली तर मात्र त्यावेळे पुरते प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
- सामान कक्षही बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे पर्यटकांनी सामान घेऊन येऊ नये.
- पक्ष्यांच्या पिंजऱ्यातील पर्यटकांसाठी असलेला छोटा पूलही बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना आत पिंजऱ्यात जाता येणार नाही, तर बाहेरूनच पक्षी पाहावे लागणार आहे.
राणीच्या बागेचं शुल्क
- सध्या प्राणीसंग्रहालयात प्रौढ व्यक्तींना ५० रुपये शुल्क
- तर लहान मुलांसाठी मुलावर २५ रुपये शुल्क आकारले जातात.
पाहा व्हिडीओ: